

माद्रिद : स्पेनच्या कॅनरी बेटांवरील 'ला पाल्मा' येथे झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून अंतराळात एक अद्भूत दृश्य पाहायला मिळाले आहे. उपग्रहाने घेतलेल्या एका आकर्षक फोटोमध्ये, ज्वालामुखीच्या वर ढगांचे गोल एकामागून एक असे चक्राकार वलय (केंद्रीत वर्तुळे) तयार झाल्याचे दिसत आहे, जे अगदी बंदुकीच्या 'लक्ष्यवेध' (Bull's-eye) चिन्हासारखे दिसत आहे.
ला पाल्मा बेटावर तब्बल ५० वर्षांनंतर झालेला हा पहिलाच ज्वालामुखीचा उद्रेक होता. या उद्रेकाची सुरुवात १९ सप्टेंबर २०२१ रोजी झाली, जेव्हा बेटाच्या दक्षिण भागात असलेल्या 'कुम्ब्रे व्हिएखा' या ज्वालामुखीच्या कड्याला पश्चिमेकडील बाजूने मोठी चीर पडली आणि हवेत लाव्हारसाचे कारंजे उडू लागले. या तीव्र उद्रेकामुळे २०० मीटर (६६० फूट) उंच मुख्य विवर (मुख) तयार झाले, ज्याला 'ताजोगाईत' असे नाव देण्यात आले. १३ डिसेंबर २०२१ पर्यंत या विवरातून संथगतीने लाव्हारस बाहेर पडत होता. या ज्वालामुखीमधून बाहेर पडलेला वितळलेला खडक अटलांटिक महासागरात एखाद्या मोठ्या 'अग्निपुत्रा नदी'सारखा वाहत गेला. या प्रवाहाने वाटेत असणारे एक संपूर्ण शहर उद्ध्वस्त केले आणि अत्यंत विषारी वायू हवेत सोडले, ज्याचा त्रास स्थानिक रहिवाशांना आजही सहन करावा लागत आहे.
उपग्रहाच्या चित्रात दिसणारी ढगांची चक्राकार वलये ही प्रामुख्याने वाफ, धूर आणि राख यांच्यापासून बनली आहेत, ज्याला 'इरप्शन प्लम' म्हटले जाते. हे वलय ताजोगाईत विवराच्या वर कित्येक आठवडे रूंजी घालत होते. सामान्यतः, ज्वालामुखीचा असा धूर पृथ्वीच्या वातावरणाच्या दुसऱ्या थरात म्हणजेच 'स्ट्रॅटोस्फिअर' (Stratosphere - जो पृथ्वीपासून १० ते ५० कि.मी. उंचीवर असतो) मधील थंड हवेत थेट वर निघून जातो. परंतु, नासाच्या 'अर्थ ऑब्झर्व्हेटरी'नुसार (NASA's Earth Observatory), हा फोटो काढला गेला तेव्हा तिथे एक दुर्मीळ हवामान स्थिती निर्माण झाली होती. वातावरणात वरच्या बाजूला अचानक उष्ण हवेचा एक थर तयार झाला, ज्याने एखाद्या 'झाकणासारखे' काम केले. या उष्ण हवेच्या थराने ज्वालामुखीच्या धुराला वर जाण्यापासून रोखले, ज्यामुळे धूर वर न जाता बाजूला पसरू लागला आणि आकाशात ही देखणी चक्राकार वलये निर्माण झाली.