

नवी दिल्ली : आजच्या धावपळीच्या जीवनात आणि प्रदूषित वातावरणामुळे आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होत चालली आहे. कमी वयातच अनेक आजार आपल्याला घेरतात. अशा परिस्थितीत शरीर सुद़ृढ ठेवण्यासाठी जीवनसत्त्वे आणि खनिजांनी युक्त आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक जीवनसत्त्वांबद्दल आपण ऐकले असेल, पण तुम्हाला ‘व्हिटॅमिन-यू’ बद्दल माहीत आहे का? पचनसंस्था आणि पोटाचे आरोग्य राखण्यासाठी हे जीवनसत्त्व अत्यंत प्रभावी ठरते.
व्हिटॅमिन-यू हे कोणतेही औषध किंवा सप्लिमेंट नसून, एक नैसर्गिक घटक आहे. हे प्रामुख्याने कोबी, ब्रोकोली आणि ‘क्रुसिफेरस’ गटातील भाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. पोटातील अतिरिक्त अॅसिड संतुलित करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी हे अत्यंत गुणकारी मानले जाते. हे पोटात तयार होणारे अतिरिक्त अॅसिड कमी करते, ज्यामुळे जळजळ आणि अॅसिडिटीची समस्या दूर होते. जंक फूड किंवा तणावामुळे आंतड्यांना होणार्या सूक्ष्म जखमा भरून काढण्याचे आणि आंतड्यांचा आतील थर मजबूत करण्याचे काम हे जीवनसत्त्व करते. हे शरीरातील दाह कमी करते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
पोषक तत्त्वांचे शोषण वाढल्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते आणि मूडही चांगला राहतो. तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन-यू चा पूर्ण लाभ घेण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे :
1. कोबी आणि ब्रोकोली : लंचमध्ये तुम्ही कच्ची कोबी किंवा वाफवलेली ब्रोकोली खाऊ शकता. कोबीवर लिंबाचा रस टाकून खाणे अधिक फायदेशीर ठरते.
2. जास्त शिजवणे टाळा : अन्न जास्त शिजवल्यास त्यातील व्हिटॅमिन-यू चे प्रमाण कमी होते. त्यामुळे भाज्या कच्च्या स्वरूपात किंवा हलक्या वाफवून कोशिंबीर म्हणून खाल्ल्यास त्याचा जास्त फायदा होतो.
3. नैसर्गिक स्रोत : यासाठी कोणत्याही कृत्रिम सप्लिमेंटची गरज नाही, केवळ घरगुती ताज्या भाज्यांतून हे मुबलक प्रमाणात मिळू शकते.