

लंडन : अँटिबायोटिक्सना दाद न देणार्या ‘सुपरबग्ज’मुळे जगभरात आरोग्य आणीबाणी निर्माण झाली आहे. अनेक जीवघेणे संसर्ग आता उपचारांपलीकडे जात आहेत. मात्र, या संकटावर मात करण्यासाठी शास्त्रज्ञांना एक अनपेक्षित ठिकाणी आशेचा किरण दिसला आहे - तो म्हणजे बॅक्टेरियांचा अब्जावधी वर्षांपासूनचा नैसर्गिक शत्रू, ‘फेज’ नावाचा विषाणू! या दोन सूक्ष्मजीवांमधील प्राचीन लढाई आता मानवासाठी अँटिबायोटिक-प्रतिरोधक संसर्गावर मात करण्याचा मार्ग दाखवत आहे.
जसजसे अधिकाधिक जीवाणू (बॅक्टेरिया) अँटिबायोटिक्सचा सामना करण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवत आहेत, तसतसे पूर्वी सहज बरे होणारे आजार आता गंभीर आणि काहीवेळा असाध्य बनत आहेत. या समस्येला ‘अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स’ (AMR) म्हणतात. या संकटामुळे जगभरात दरवर्षी दहा लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो आणि हा आकडा वेगाने वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याला जगासमोरील दहा प्रमुख आरोग्य धोक्यांपैकी एक म्हणून घोषित केले आहे.
फेज थेरपी प्रभावी असली, तरी तिच्यासमोर एक मोठे आव्हान आहे, ते म्हणजे बॅक्टेरियांची स्वतःची संरक्षण प्रणाली. बॅक्टेरियांनी फेजच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी अब्जावधी वर्षांमध्ये अत्यंत प्रभावी यंत्रणा विकसित केल्या आहेत. काही बॅक्टेरिया विषाणूच्या ‘डीएनए’चे तुकडे करतात, तर काही त्यांना पेशींमध्ये प्रवेश करण्यापासून रोखतात. ‘सेल’ या प्रतिष्ठित सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात, संशोधकांनी बॅक्टेरियाच्या अशाच एका वेगळ्या संरक्षण प्रणालीचे वर्णन केले आहे, जिला त्यांनी ‘किवा’ (Kiwa) असे नाव दिले आहे. ही प्रणाली बॅक्टेरियाच्या पेशीपटलामध्ये (membrane) एका सेन्सरप्रमाणे काम करते. जेव्हा एखादा फेज बॅक्टेरियावर हल्ला करून आपला डीएनए आत सोडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा पेशीवर येणारा यांत्रिक ताण ‘किवा’ प्रणाली ओळखते आणि तत्काळ सक्रिय होते. सक्रिय झाल्यावर, ती फेजला नवीन विषाणू तयार करण्यासाठी लागणारे घटक बनवण्यापासून रोखते, ज्यामुळे संसर्ग सुरुवातीच्या टप्प्यातच थांबवला जातो.
या पार्श्वभूमीवर, ‘फेज थेरपी’ एक संभाव्य उपाय म्हणून समोर येत आहे. फेज थेरपी म्हणजे बॅक्टेरियामुळे होणार्या संसर्गावर उपचार करण्यासाठी ‘बॅक्टेरियोफेज’ (थोडक्यात, फेज) नावाच्या विषाणूंचा वापर करणे. हे विषाणू बॅक्टेरियांचे नैसर्गिक शिकारी आहेत.
या थेरपीचे वैशिष्ट्य म्हणजे फेज अत्यंत विशिष्ट असतात; ते केवळ लक्ष्य असलेल्या बॅक्टेरियांनाच शोधून नष्ट करतात आणि मानवी पेशींना कोणताही धोका पोहोचवत नाहीत. ब्रिटनसारख्या देशांमध्ये, जिथे सर्व अँटिबायोटिक्स अयशस्वी ठरले होते, अशा काही गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णांवर शेवटचा उपाय म्हणून फेज थेरपीचा वापर केला गेला आणि त्याचे आश्चर्यकारक परिणाम दिसून आले.