

मुंबई : सध्या लग्नसराईचे दिवस असून, सोशल मीडियावर लग्नातील विधी, डान्स आणि पाहुण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र, सध्या एका अशा लग्नाचा व्हिडीओ चर्चेत आला आहे, जिथे पाहुण्यांसाठी चक्क एका पेट्रोल पंपची व्यवस्था केलेली दिसून येते. अर्थातच हा खरा पेट्रोल पंप नसून पाहुण्यांना ज्यूस पिण्याची सोय अशी ‘शाही’ आणि ‘भन्नाट’ पद्धतीने करण्यात आली आहे!
लग्नामध्ये तुम्ही आजवर कॉफी, पॉपकॉर्न किंवा कोल्ड्रिंकच्या मशिन पाहिल्या असतील; पण एका लग्नात चक्क पेट्रोल पंपासारखी दिसणारी मशिन लावण्यात आली आहे. हे खरे पेट्रोल पंप नसून पेट्रोल पंपाच्या थीमवर आधारित एक ‘ज्यूस मशिन’ आहे. ज्याप्रमाणे पेट्रोल पंपावर गाडीच्या टाकीत इंधन भरले जाते, अगदी त्याच पद्धतीने पाहुणे या मशिनचा नोजल वापरून आपल्या ग्लासमध्ये ज्यूस भरून घेत आहेत. ही अनोखी शक्कल पाहुण्यांमध्ये आकर्षणाचे केंद्र ठरली आहे.
हा मजेशीर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @ajayupadhyay5837 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. बातमी मिळेपर्यंत या व्हिडीओला 2.1 कोटींहून (21 मिलियन) अधिक वेळा पाहिले गेले आहे. तसेच, 3.7 लाखांहून अधिक लोकांनी याला लाईक केले असून, कमेंटस्चा पाऊस पडत आहे. हा ‘ज्यूस पंप’ पाहून युजर्सनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत : एका युजरने गमतीने लिहिले, ‘किती वाईट काळ आला आहे!’ दुसर्या युजरने याला ‘पेट्रोल पंप नव्हे, ज्यूस पंप’ असे नाव दिले आहे. अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी वापरून या कल्पनेचे कौतुक केले आहे. लग्नातील हा आगळावेगळा प्रयोग सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत असून, ‘जुगाड’ करण्यात भारतीय सर्वात पुढे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.