वॉशिंग्टन :
अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा' आणि युरोपियन स्पेस एजन्सी 'इएसए'ने संयुक्त प्रयत्न करून गतसाली सूर्याचा अभ्यास करण्यासाठी 'सोलर ऑर्बिटर' प्रक्षेपित केले होते. हे ऑर्बिटर सूर्याच्या दिशेने जात असताना मार्गात ते शुक्र ग्रहाजवळ आले होते. त्याला ऑपरेट करणार्या शास्त्रज्ञांनी या ऑर्बिटरमधील काही उपकरणे शुक्राच्या दिशेने वळविली. आता या ऑर्बिटरकडून मिळणारी आकडेवारी शुक्राची महत्त्वपूर्ण माहिती देऊ शकते.
'सोलर ऑर्बिटर'ने गेल्या 27 डिसेंबर रोजी शुक्राच्या अगदी जवळ जाण्याचा विक्रम केला. यावेळी ऑर्बिटर आणि शुक्रावरील ढग यांच्यात केवळ 75 हजार कि.मी. इतके अंतर होते. एखादा मानवनिर्मित उपग्रह प्रथमच शुक्राच्या इतक्या जवळ पोहोचला होता. यामुळे शुक्राबद्दल महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
'सोलर ऑर्बिटर'च्या या कामगिरीबद्दल बोलताना 'इएसए'चे या मिशनशी संबंधित शास्त्रज्ञ डॅनिएल मूलर यांनी सांगितले की, तसे पाहिल्यास हे ऑर्बिटर शुक्राचे अवलोकन करण्यासाठी तयार करण्यात आलेले नाही. असे असले तरी विज्ञानात नेहमीच अतिरिक्त संधी शोधण्याचा प्रयत्न केला जात असतो. यामुळेच सोलर ऑर्बिटर ज्यावेळी शुक्राजवळून जाईल तेव्हा या ग्रहासंबंधीची आकडेवारी गोळा करेल, असे वाटले होते. यामध्ये आम्हाला चांगले यश मिळाले.