

न्यूयॉर्क/काराकास : व्हेनेझुएलाचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो सध्या न्यूयॉर्कमधील तुरुंगात आहेत. 3 जानेवारी रोजी पहाटे अमेरिकन सैन्याने काराकासवर हल्ला करून मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अटक केली होती. या अटकेनंतर आता मादुरो यांच्याबद्दल एक धक्कादायक आणि विशेष माहिती समोर आली आहे, ती म्हणजे त्यांचे भारताशी असलेले खास नाते.
राजकीय संकटाचा सामना करत असलेल्या मादुरो यांचे भारताशी आध्यात्मिक नाते आहे. याचे श्रेय त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना जाते. मादुरो हे मुळचे कॅथोलिक असले तरी, फ्लोरेस यांच्याशी विवाह करण्यापूर्वीच ते आध्यात्मिक क्षेत्राकडे वळले होते. मादुरो आणि त्यांची पत्नी दोघेही सत्य साईबाबांचे निस्सीम अनुयायी आहेत. 2005 मध्ये या दांपत्याने भारताचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी येथील ‘प्रशांती निलयम’ आश्रमाला भेट दिली आणि सत्य साईबाबांचे दर्शन घेतले होते.
सध्या सोशल मीडियावर मादुरो यांचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते आणि त्यांची पत्नी सत्य साईबाबांच्या चरणाशी जमिनीवर बसलेले दिसत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, व्हेनेझुएलाची सत्ता हाती घेतल्यानंतरही मादुरो यांनी त्यांच्या ‘मीराफ्लोरेस पॅलेस’मधील खासगी कार्यालयात सायमन बोलिवर आणि ह्यूगो चावेज यांच्यासोबत सत्य साईबाबांचे छायाचित्र लावले होते. 2011 मध्ये सत्य साईबाबांचे निधन झाले तेव्हा त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व्हेनेझुएलाचे परराष्ट्र मंत्री स्वतः भारतात आले होते. इतकेच नव्हे तर, व्हेनेझुएलाच्या संसदेत शोकसभा आयोजित करून एक दिवसाचा राष्ट्रीय शोकही जाहीर करण्यात आला होता.
गेल्या काही वर्षांत व्हेनेझुएलामध्ये सत्य साई संघटनेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. लॅटिन अमेरिकेतील व्हेनेझुएला हा असा देश आहे जिथे साईबाबांचे अनुयायी मोठ्या संख्येने आहेत. 2024 मध्ये व्हेनेझुएलाने राष्ट्रीय दिनाचे जे निमंत्रण पत्र पाठवले होते, त्यावर ‘ॐ’ हे प्रतीक चिन्ह छापलेले होते. अटकेच्या काही काळ आधी, नोव्हेंबर 2025 मध्ये मादुरो यांनी सत्य साईबाबांचे स्मरण करताना म्हटले होते की, ‘मी नेहमीच त्यांची आठवण काढतो. मला आशा आहे की, त्यांचा प्रकाश आम्हाला नेहमीच मार्ग दाखवत राहील.’