

हल्ली स्क्रिनटाईम वाढल्यामुळे अनेक जणांना नजर धुरस होणे, डोळे दुखणे, चष्मा लागणे, मोतीबिंदू होणे तसेच डोळ्यांमध्ये जळजळ होणे या समस्याचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. या समस्या वृद्धांमध्येच नाही तर तरुणांमध्येही उद्भवू लागल्या आहेत. आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये डोळे महत्त्वाची भूमिका बजावतात. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी पौष्टिक आहार, पुरेशी विश्रांती आणि डोळे स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. लहानपणापासूनच वडीलधारे द़ृष्टी सुधारण्यासाठी दररोज गाजर खाण्याचा सल्ला देतात हे सर्वांनाच माहिती आहे; परंतु अभ्यासातून असे दिसून आले आहे की केवळ गाजरच नाही तर इतर काही भाज्यादेखील द़ृष्टी सुधारण्यास हातभार लावतात. द़ृष्टी सुधारण्यासाठी आणि डोळ्याचे आरोग्य टिकवण्यासाठी कोणते आहार महत्त्वाचे आहेत ते जाणून घेऊया...
पालक : पालकला ‘दूध पालक’ म्हणूनही ओळखलं जातं, त्यात ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन या दोन अँटिऑक्सिडंटस् भरपूर प्रमाणात असतात. हे हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणे आणि निळ्या प्रकाशामुळे होणार्या नुकसानापासून डोळ्यांचे संरक्षण करतात. पालक मॅक्युलर डीजनरेशन आणि मोतीबिंदू रोखण्यास मदत करते. NCBI जर्नल डायटरी सोर्सेस ऑफ ल्युटीन अँड झेक्सॅन्थिन कॅरोटीनोईडस् अँड देअर रोल इन आय हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या 2013 च्या अभ्यासानुसार, पालकचा 4 आठवड्यांचा उच्च डोस आहार मॅक्युलर पिग्मेंट ऑप्टिकल घनता 4 - 5 टक्केने वाढवतो.
रताळे : रताळे हे व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीनचे उत्कृष्ट स्रोत आहेत. कॉर्नियाचे आरोग्य राखण्यासाठी आणि रात्रीची द़ृष्टी सुधारण्यासाठी व्हिटॅमिन ए महत्त्वाचे आहे. म्हणून नियमित आहारात एक तरी रताळ घेणे महत्त्वाचे आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलेय.
ब्रोकोली : ही भाजी व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंटस्ने समृद्ध आहे. ती रेटिनाचे आरोग्य सुधारते आणि ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करते, ज्यामुळे कालांतराने डोळ्यांना नुकसान होऊ शकते. आठवड्यातून तीन किंवा चार वेळा अर्धा कप उकडलेले ब्रोकोली तुमच्या आहारात समाविष्ट करण्याची शिफारस केली जाते.
गाजर : गाजरांमध्ये बीटा-कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते. जे शरीरात जाऊन व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित करते. गाजर डोळ्यांच्या संसर्गाचा धोका कमी करतात आणि डोळे ओलसर ठेवतात. NCBI जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या ‘गाजर, कॅरोटीन आणि सीईंग इन द डार्क’ या 1999 च्या अभ्यासानुसार, गाजर खाल्ल्याने रात्रीचे अंधत्व टाळता येऊ शकते. यामुळे नियमित एक गाजर खाणे चांगले आहे.
शिमला मिरची : बाजारात वेगवेगळ्या रंगांची शिमला मिरची उपलब्ध आहे; परंतु लाल शिमला मिरची आरोग्याच्या द़ृष्टीने चांगली असल्याचे म्हटले जाते. कारण लाल शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सीची मात्रा पुरेशा प्रमाणात असते. हे एक अँटिऑक्सिडंट आहे जे डोळ्यांमधील रक्तवाहिन्यांच्या आरोग्यास राखण्यास आणि मोतीबिंदूचा धोका कमी करण्यास मदत करते.
टोमॅटो : टोमॅटोमध्ये लाईकोपीन मुबलक प्रमाणात असते, जे एक अँटिऑक्सिडंट आहे जे रेटिनाचे संरक्षण करते आणि वयाशी संबंधित मॅक्युलर डीजनरेशनचा धोका कमी करते. त्यात व्हिटॅमिन सी आणि ए देखील असतात, जे डोळ्यांचे एकूण आरोग्य सुधारतात.