

जकार्ता : तुम्ही कधी अशा लोकांबद्दल ऐकले आहे का, ज्यांचा जमिनीशी कोणताही संबंध नाही? ज्यांच्याकडे ना पासपोर्ट आहे, ना जमिनीवर पक्के घर. आपण बोलत आहोत ‘बजऊ’ लोकांविषयी, ज्यांना जगातील शेवटचे खरे ‘समुद्री खानाबदोश’ (Sea Nomads) किंवा समुद्रातील भटके लोक म्हटले जाते. यांचा जन्म बोटीवर होतो, हे समुद्राच्या लाटांवरच मोठे होतात आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य निळ्या पाण्याभोवतीच संपते.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही लोक कोणत्याही ऑक्सिजन सिलिंडर किंवा डायव्हिंग सूटशिवाय समुद्राच्या खोलीत अगदी सहज वावरत आहेत. हे लोक ‘बजऊ’ जमातीचे असून, ते इंडोनेशिया आणि मलेशियाच्या दरम्यान असलेल्या समुद्रात राहतात. त्यांची घरे लाकडाच्या खांबांवर पाण्यावरच बांधलेली असतात. बजऊ लोकांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही एका देशाशी किंवा सरहद्दीशी बांधलेले नाहीत. ते पिढ्यान्पिढ्या एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी फिरत असतात, त्यामुळे त्यांना कोणत्याही एका देशाचे नागरिक म्हणणे कठीण आहे. त्यांच्यासाठी समुद्रच त्यांचे घर आणि उपजीविकेचे साधन आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, शेकडो वर्षे पाण्यात राहिल्यामुळे या लोकांच्या शरीरात काही जनुकीय बदल झाले आहेत. पाण्याखाली स्पष्ट द़ृष्टी : सामान्य मानवाला पाण्याखाली सर्व काही धूसर दिसते; मात्र बजऊ लोकांच्या डोळ्यांना पाण्याखाली अगदी स्पष्ट दिसते. खोलवर जाण्याची क्षमता : या जमातीची मुले अगदी लहानपणापासूनच गोताखोरी (Diving) सुरू करतात. जगण्यासाठी ते 100 फूट खोल समुद्रात सहज डुबकी मारू शकतात. समुद्रात खोलवर जात असताना पाण्याचा दाब सहन करण्यासाठी बजऊ लोक लहानपणीच स्वतःचे कानाचे पडदे फोडून घेतात. हे ऐकायला अत्यंत वेदनादायक वाटते; परंतु खोल पाण्यात शिकार करताना दबाव जाणवू नये म्हणून ते ही पद्धत अवलंबतात. यामुळे म्हातारपणापर्यंत हे लोक मोठ्या प्रमाणावर बहिरे होतात; मात्र समुद्रात जगण्यासाठी ते याच तंत्रावर अवलंबून आहेत.