रायपूर : तुम्ही कधी 'बॉडीबिल्डर' जिल्हाधिकारी पाहिला आहे का? छत्तीसगढच्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्याचे कलेक्टर (जिल्हाधिकारी) असे बॉडीबिल्डर आहेत. विनीत नंदनवार असे त्यांचे नाव. नंदनवार हे नेहमीच फिटनेसबाबत जागरूक असतात. त्यांचे सिक्स पॅक अॅब्स पाहून अनेक बॉडीबिल्डरही थक्क होतात!
विनीत हे मूळचे जगदलपूर येथील आहेत. त्यांचे शिक्षण सरकारी शाळेतच झाले होते. सुकमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बनण्यापूर्वी ते रायपूरमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी होते. एक महिन्यापूर्वीच त्यांनी सुकमा जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारला आहे. आरोग्य आणि संतुलित जीवनशैली याबाबत ते नेहमीच जागरूक असत. आपल्या सरकारी कामाव्यतिरिक्त मिळालेल्या वेळेचा ते फिटनेससाठी उपयोग करतात. माणूस नेहमीच कामात असतो; पण फिटनेससाठी दिवसातील एक तास तरी देता येतोच, असे ते म्हणतात. ऑगस्टमध्ये ते कोरोना संक्रमित झाले होते. कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा व्यायाम व तंदुरुस्तीकडे लक्ष दिले.'यह वक्त भी गुजर जाएगा' हे त्यांचे आवडते वाक्य आहे. आशा आणि निराशा जीवनात येतच असतात. वाईट काळ हा आपल्याला मजबूत करीत असतो, त्यामुळे अशावेळी त्रस्त होण्याची गरज नाही असेही ते सांगतात. ते 2013 च्या बॅचचे आयएएस आहेत.