

व्हिएन्ना : सेफॅलोपॉड (डोके-पाय) प्राण्यांच्या उत्क्रांतीच्या इतिहासात दीर्घकाळ एक महत्त्वाचा दुवा हरवलेला होता, स्क्विडसारख्या पूर्वजांपासून आजच्या ऑक्टोपसचा उगम नेमका कसा झाला? याचे उत्तर आता खोल समुद्रात सापडले आहे. चमकणारे, भुतासारखे डोळे, ऑक्टोपससारख्या आठ भुजा आणि गडद माणिकरंगाची छटा असलेला दुर्मीळ व्हॅम्पायर स्क्विड (Vampyroteuthis infernalis) अखेर आपली जनुकीय रहस्ये उघड करत आहे. ‘आयसायन्स’ या वैज्ञानिक नियतकालिकात प्रकाशित झालेल्या अभ्यासात, संशोधकांनी व्हॅम्पायर स्क्विडचा संपूर्ण जीनोम (जनुकसंच) उलगडला.
या अभ्यासातून धक्कादायक बाब समोर आली आहे. ऑक्टोपस गटात मोडत असूनही, या प्रजातीचे गुणसूत्रे आजच्या स्क्विड आणि कटलफिशसारखेच आहेत. या शोधामुळे सुमारे 30 कोटी वर्षांपूर्वी स्क्विड आणि ऑक्टोपस वेगळे झाले तेव्हा त्यांचा समान पूर्वज जनुकीय पातळीवर कसा दिसत असावा, याची महत्त्वाची झलक मिळते. त्यामुळे संशोधकांनी व्हॅम्पायर स्क्विडला ‘जिवंत जीवाश्म’ (Living Fossil) असे संबोधले आहे.
ऑस्ट्रियातील व्हिएन्ना विद्यापीठातील न्यूरोसायन्स आणि विकासजीवशास्त्र विभागातील संशोधक ओलेग सिमाकोव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्क्रांतीच्या वृक्षात व्हॅम्पायर स्क्विड हा ऑक्टोपस गटात असला तरी, इतर प्रजातींपासून त्याचा अत्यंत प्राचीन काळात विभाजन झाला आहे. पश्चिम पॅसिफिक महासागरातील संशोधन मोहिमेदरम्यान अपघाती जाळ्यात सापडलेल्या व्हॅम्पायर स्क्विडच्या ऊतींचा नमुना मिळाल्यानंतर, संशोधकांनी ‘पॅकबायो’ या अत्याधुनिक जनुकीय विश्लेषण तंत्राचा वापर करून त्याचे डीएनए अनुक्रमण केले. मात्र, ही प्रजाती अत्यंत दुर्मीळ असल्याने तुलनेसाठी इतर नमुने उपलब्ध नव्हते.
यानंतर या जीनोमची तुलना आर्गोनॉट ऑक्टोपस, सामान्य ऑक्टोपस आणि कर्ल्ड ऑक्टोपस अशा इतर सेफॅलोपॉड प्रजातींशी करण्यात आली. या संशोधनात असे आढळले की व्हॅम्पायर स्क्विडचा जीनोम तब्बल 11 अब्ज बेस-पेअर्सचा आहे, जो मानवी जीनोमपेक्षा जवळपास चारपट मोठा असून, आतापर्यंत अनुक्रमित केलेल्या सर्व सेफॅलोपॉड जीनोम्सपैकी सर्वात मोठा आहे. आजच्या ऑक्टोपस प्रजातींमध्ये डीएनएची सतत फेरमांडणी होत असते, ज्यामुळे गुणसूत्रांचे मिश्रण दिसते. मात्र, व्हॅम्पायर स्क्विडमध्ये ही रचना बरीचशी मूळ, स्क्विडसद़ृश अवस्थेत जतन झालेली आहे. थोडक्यात सांगायचे तर, व्हॅम्पायर स्क्विड हा दिसायला ऑक्टोपस असला, तरी जनुकीयद़ृष्ट्या तो प्राचीन स्क्विडसारखा आहे आणि म्हणूनच तो सेफॅलोपॉड उत्क्रांतीच्या इतिहासातील हरवलेला दुवा ठरत आहे.