दुसर्या महायुद्धात चोरीला गेलेले मौल्यवान चित्र मिळाले
मार डेल प्लाटा, अर्जेंटिना : दुसर्या महायुद्धात ज्यू कला संग्राहकाकडून चोरीला गेलेले ‘पोर्ट्रेट ऑफ अ लेडी’ हे मौल्यवान चित्र अखेर 80 वर्षांनंतर सापडले आहे. अर्जेंटिनामधील पोलिसांनी फरार नाझी अधिकारी फ्रेडरिक काडगिएन यांच्या मुलीवर, पेट्रीसिया काडगिएनवर, चित्र लपवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आरोप दाखल केले आहेत.
इटालियन चित्रकार ज्युसेप्पे घिसलांडी यांचे 18 व्या शतकातील हे चित्र, नाझींनी ज्यू कला व्यापारी जॅक गौडस्टिकर यांच्या संग्रहातून चोरीला गेले होते. गौडस्टिकर हे 1940 मध्ये नाझी जर्मनीच्या आक्रमणातून पळून जात असताना एका जहाजाच्या अपघातात मरण पावले. त्यांच्या संग्रहातील 1,100 हून अधिक चित्रे अजूनही चोरीला गेली आहेत. हे चित्र गेल्या महिन्यात एका ऑनलाईन रिअल इस्टेट जाहिरातीमध्ये दिसले. डच पत्रकारांनी फ्रेडरिक काडगिएनच्या अर्जेंटिनामधील इतिहासाचा शोध घेत असताना, विकण्यासाठी असलेल्या घराच्या 3डी टूरमध्ये हे चित्र पाहिले. हे चित्र नाझींनी लुटलेल्या कलाकृतींच्या आंतरराष्ट्रीय दस्तऐवजांमध्ये हरवलेले म्हणून सूचीबद्ध होते. त्यानंतर पोलिसांनी पेट्रीसिया काडगिएनच्या घरावर छापा टाकला; परंतु चित्र तिथे सापडले नाही. त्या ठिकाणी केवळ एक टॅपस्ट्री (तपकिरी रंगाचे कापड) आणि खुणा आढळल्या. अभियोक्त्यांच्या म्हणण्यानुसार, काडगिएन आणि तिच्या पतीने चित्र लपवण्याचा प्रयत्न केला. अखेर, अनेक छाप्यांनंतर काडगिएनच्या वकिलांनी चित्र पोलिसांच्या ताब्यात दिले.
59 वर्षीय पेट्रीसिया काडगिएन आणि तिचा पती जुआन कार्लोस कॉर्टेगोसो (62) यांच्यावर चित्र लपवल्याचा आणि न्याय प्रक्रियेत अडथळा आणल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांची सध्या घरगुती नजरकैदेतून सुटका करण्यात आली आहे; पण त्यांना परदेशात जाण्यावर बंदी आहे. या प्रकरणात गौडस्टिकरच्या वारसांनी चित्र परत मिळवण्यासाठी कायदेशीर दावा दाखल केला आहे.

