

डेहराडून : पेट्रोल, डिझेल किंवा कोणत्याही इंधनाशिवाय एखादी कार थेट हवेत उडू शकते, असा विचार कधी तुम्ही केला आहे का? ऐकायला थोडे विचित्र वाटले, तरी देवभूमी उत्तराखंडमधील एका पहाडी गावातील तरुणाने हा अद्भुत चमत्कार प्रत्यक्षात करून दाखवला आहे. अल्मोडा येथील रवी टमटा या तरुणाने भारताची स्वदेशी इलेक्ट्रिक फ्लाईंग कार ‘HAPIDA SKYNeX’ची यशस्वी चाचणी घेऊन सर्वांना थक्क केले आहे. वाहतूक कोंडी आणि डोंगराळ भागातील कठीण रस्त्यांवर मात करणाऱ्या या तंत्रज्ञानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
उत्तराखंडमधील जागेश्वर धामजवळ असलेल्या काफलीखान गावातील रहिवासी रवी टमटा यांनी त्यांच्या ‘हपिडा स्काई प्रायव्हेट लिमिटेड’ या स्टार्टअपअंतर्गत HAPIDA SKYNeX हे ‘इलेक्ट्रिक पर्सनल फ्लाईंग व्हेईकल’ (पर्सनल हवाई वाहन) तयार केले आहे. वर्षानुवर्षांचे संशोधन आणि कठोर परिश्रमांनंतर या प्रोटोटाईपची घेतलेली यशस्वी चाचणी हा या प्रकल्पातील एक मोठा टप्पा मानला जात आहे. यामुळे वैयक्तिक हवाई प्रवासाचे स्वप्न आता सत्याच्या अगदी जवळ आले आहे. इतर विमानांप्रमाणे महागडे एव्हिएशन फ्युएल (विमानाचे इंधन) किंवा इथॅनॉलचा वापर करण्याऐवजी, ही कार पूर्णपणे इलेक्ट्रिक तंत्रज्ञानावर डिझाईन करण्यात आली आहे.
यातून कोणतेही प्रदूषण होत नसल्याने हे वाहन निसर्गासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत रवी टमटा यांच्या या नवनिर्मितीचे मनापासून कौतुक केले आहे. रवी टमटा यांच्या मते, भारतभर सुरक्षित, परवडणारा आणि शाश्वत असा वैयक्तिक हवाई प्रवास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. उत्तराखंडसारख्या दुर्गम आणि डोंगराळ भागात जिथे दरडी कोसळणे आणि महापुरासारख्या आपत्ती नेहमी येतात, तिथे हे वाहन अत्यंत उपयुक्त ठरू शकते.
पूर किंवा भूस्खलनाच्या वेळी मदत आणि बचाव कार्यासाठी हे वाहन संजीवनी ठरेल. दुर्गम गावांमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी याचा मोठा फायदा होईल. डोंगराळ भागात प्रवासाचा एक नवीन आणि थरारक पर्याय उपलब्ध झाल्याने राज्यातील पर्यटनाला मोठी गती मिळू शकते. सध्या हे वाहन केवळ ‘प्रोटोटाईप’ (प्रारंभिक चाचणी) टप्प्यात असून, व्यावसायिक वापरासाठी त्याला अजून अनेक सुरक्षा चाचण्या आणि शासकीय मान्यता मिळवणे बाकी आहे.