

लंडन ः 21 वे शतक हे डिजिटल युग मानले जाते. मोबाईल फोन्सनी आपले जीवन नक्कीच सोपे केले आहे; परंतु याच मोबाईलच्या अतिवापरामुळे आता मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागले आहेत. तासन्तास सोशल मीडिया स्क्रोल करणे किंवा गेम खेळणे ही आता एक सवय झाली आहे; पण तुम्हाला माहीत आहे का? ही सवय तुम्हाला रुग्णालयाच्या पायर्या चढायला लावू शकते. मोबाईलपासून दूर गेल्यावर जाणवणारी अस्वस्थता ही एक मानसिक आरोग्य समस्या आहे, ज्याला ‘नोमोफोबिया’ असे म्हटले जाते. आजकाल लोक टॉयलेटमध्ये जातानाही मोबाईल सोबत नेतात. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही टॉयलेटमध्ये मोबाईलशिवाय राहू शकत नसाल, तर ही परिस्थिती चिंताजनक आहे.
वरिष्ठ यूरोलॉजिस्ट सांगतात, टॉयलेटमध्ये बसून मोबाईल वापरल्याने मूळव्याध होण्याचा धोका तब्बल 45 टक्क्यांनी वाढतो. याचे मुख्य कारण म्हणजे, मोबाईलमुळे लोक 5 मिनिटांऐवजी 15-20 मिनिटे टॉयलेट सीटवर बसून राहतात. जास्त वेळ बसून राहिल्याने गुद्द्वाराच्या नसांवर अतिरिक्त दाब पडतो, ज्यामुळे मूळव्याध आणि ‘एनल फिशर’सारख्या समस्या उद्भवतात. एका संशोधनात असे समोर आले आहे की, टॉयलेटमध्ये नेल्या जाणार्या फोनवर दरवाजाच्या हँडलपेक्षा 10 पट जास्त बॅक्टेरिया असतात. टॉयलेटमध्ये फ्लश केल्यावर हवेत पसरणारे जंतू थेट फोनवर जमा होतात.
तोच फोन आपण नंतर चेहर्याला लावतो किंवा जेवताना वापरतो, ज्यामुळे डायरिया आणि पोटाचे विकार होतात. आपण हात धुतो; पण फोन कधीच सॅनिटाईज करत नाही, त्यामुळे तो ‘मिनी जर्म हाऊस’ बनतो. सततच्या स्क्रोलिंगमुळे मेंदूला ‘डोपामिन’ची सवय लागते, ज्यामुळे एकाग्रता कमी होते. टॉयलेटमध्ये वाकून फोन पाहिल्याने मान, पाठ आणि पेल्विक फ्लोअरवर ताण येतो. याचा परिणाम मूत्राशय नियंत्रणावरही होऊ शकतो. आरोग्यतज्ज्ञांनी असा सल्ला दिला आहे की, टॉयलेटमध्ये जाताना मोबाईल बाहेरच ठेवावा. टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसणे टाळावे आणि नियमितपणे हात धुण्यासोबतच आपला फोनदेखील अधूनमधून निर्जंतुक करावा. आपली ही छोटीशी सवय तुम्हाला मोठ्या आजारांपासून वाचवू शकते.