

वॉशिंग्टन ः अमेरिकेच्या ‘एक्स-37 बी’ या रहस्यमय अंतराळ यानाने 434 दिवसांच्या गुप्त मिशननंतर यशस्वीपणे पृथ्वीवर पुनरागमन केले आहे, अशी माहिती अमेरिकन स्पेस फोर्सने दिली आहे. हा मानवरहित अंतराळ विमानाचा सातवा प्रयोगात्मक प्रवास होता. या मिशनचे अनेक तपशील अजूनही गुप्त ठेवण्यात आले आहेत; मात्र स्पेस फोर्सने या मोहिमेला ‘एक्स-37बी कार्यक्रमाचा एक रोमांचक नवा अध्याय,’ असे संबोधले आहे.
स्पेस फोर्सच्या प्रमुख जनरल चान्स साल्टझ्मन यांच्या मते, या मोहिमेद्वारे ‘एक्स-37बी’ च्या विविध कक्षीय प्रयोगक्षमतेचे प्रदर्शन करण्यात आले. यामध्ये विशेषतः एअरब—ेकिंग तंत्राचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. सामान्यतः उपग्रह आपली उंची बदलण्यासाठी थ—स्टर्स वापरतात, पण ‘एक्स-37 बी’ ने वातावरणातील घर्षणाचा वापर करून इंधनाचा अतिशय कमी वापर करत आपली कक्षा कमी करण्याचे तंत्र आजमावले. यासाठी अंतराळ यानाने स्वतःच्या नाकाचा कोन बदलून वातावरणातील घर्षण वाढवले आणि उंची कमी केली. या मोहिमेत अंतराळीय किरणोत्सर्ग आणि ‘स्पेस डोमेन अवेअरनेस टेक्नॉलॉजी’ संबंधित प्रयोग करण्यात आले. यामध्ये कदाचित पृथ्वीच्या कक्षेत फिरणार्या वस्तू शोधण्याच्या नव्या तंत्रज्ञानाची चाचणी घेतली गेली असावी. 29 डिसेंबर 2023 रोजी, स्पेसएक्स फाल्कन हेवी रॉकेटवरून हे अंतराळ यान व्हँडनबर्ग स्पेस फोर्स बेस, कॅलिफोर्निया येथून प्रक्षेपित करण्यात आले. याला अत्यंत लंबवर्तुळाकार कक्षेत सोडण्यात आले होते. 7 मार्च 2025 रोजी, ‘एक्स-37बी’ रात्रीच्या अंधारात गुप्तपणे व्हँडनबर्ग स्पेस फोर्स बेसवर परतले. अमेरिकन स्पेस फोर्सने या मोहिमेतील संपूर्ण प्रयोगांविषयी अधिक माहिती दिलेली नाही. मात्र, या यशस्वी प्रयोगामुळे भविष्यातील गुप्त सैन्य व तांत्रिक अंतराळ मोहिमांसाठी नवे दार उघडले आहे.