

वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय डिजिटल जगात क्रांती घडवून आणण्यासाठी अमेरिका आणि फ्रान्सदरम्यान समुद्राच्या तळाशी तब्बल ४,३०० मैल (७,००० किलोमीटर) लांबीची नवीन फायबर केबल टाकण्यात येणार आहे. ही केबल प्रति सेकंद तब्बल १ दशलक्ष गिगाबिट (१ मिलियन जीबीपीएस) या अत्यंत वेगाने डेटा ट्रान्सफर करणार आहे.
या वेगाचा अंदाज लावायचा झाल्यास, याद्वारे दर सेकंदाला सुमारे १२५ टेराबाईट डेटा (किंवा प्रत्येकी ५ जीबी साईझचे अंदाजे २५,००० एचडी चित्रपट) ट्रान्सफर करणे शक्य होईल. या महत्त्वाकांक्षी केबलचे नाव ‘पेटल’ असून, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी असलेल्या ‘मेटा’कडून या प्रकल्पासाठी निधी पुरवला जाईल व ती चालवली जाईल. ‘मेटा’च्या प्रतिनिधींनी एका निवेदनात सांगितले की, जेव्हा ही महासागरापार जाणारी केबल २०२९ मध्ये प्रत्यक्षात कार्यान्वित होईल, तेव्हा महासागरापार एवढ्या लांबीवर पेटाबिट क्षमता देणारी ही जगातील पहिलीच केबल ठरेल. ही क्षमता सध्याच्या अशाच लांबीच्या पाणबुडी केबल्सच्या दुप्पट आहे.
हा डेटा प्रवाह इतका प्रचंड आहे की, जगातील ७५ टक्के लोकसंख्या एकाच वेळी गाणी प्रवाहित करू शकेल. निवेदनानुसार, ‘पेटल’ ही बहु-कोर फायबर (multi-core fiber) तंत्रज्ञानाचा वापर करणारी पहिली व्यावसायिक पाणबुडी केबल सिस्टीम असणार आहे. पारंपरिक फायबर स्टँड्समध्ये साधारणपणे एकच कोर असतो; परंतु ‘पेटल’च्या प्रत्येक फायबर स्टँडमध्ये दोन कोर असतील जे विरुद्ध दिशेने ऑप्टिकल सिग्नल वाहून नेतील. यामुळे एकाच स्टँडमध्ये अशा दोन पारंपरिक सिंगल-कोर फायबरच्या जोडीएवढी क्षमता मिळेल. या प्रत्येक फायबर स्टँडची जाडी मानवी केसांसारखीच पातळ असून, तिचा व्यास अवघा १२५ मायक्रोमीटर आहे. ‘पेटल’मध्ये ड्युअल-कोर फायबरच्या २४ जोड्या असतील, ज्यामुळे त्यात एकूण ९६ वैयक्तिक फायबर कोर असतील.
यामुळे ही केबल पारंपरिक फायबरच्या ४८ जोड्यांएवढा डेटा वाहून नेण्यास सक्षम बनेल, असे ‘मेटा’च्या इंजिनिअर्सनी स्पष्ट केले. या प्रकल्पाच्या एकूण डिझाईन आणि बांधणीची जबाबदारी जपानी तंत्रज्ञान कंपनी NEC कडे असेल, तर सुमितोमो इलेक्ट्रिक ही कंपनी यासाठी फायबर पुरवणार आहे. NEC च्या पाणबुडी नेटवर्क विभागाचे मुख्य रणनीती अधिकारी एडुआर्डो माटेओ यांनी निवेदनात म्हटले, ‘‘महासागरापारच्या पाणबुडी सिस्टीममध्ये प्रति-सेकंद पेटाबिट क्षमता साध्य करणे हा जागतिक दूरसंवादाच्या इतिहासातील एक मोठा तांत्रिक टप्पा आहे.’’ संयुक्त राष्ट्रांच्या डिजिटल तंत्रज्ञानविषयक एजन्सी असलेल्या ‘आंतरराष्ट्रीय दूरसंचार युनियन’ (International Telecommunication Union) नुसार, पाणबुडी केबल्स या इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चरचा सर्वात महत्त्वाचा भाग आहेत. जगातील सुमारे ९९ टक्के इंटरनेट ट्रॅफिक या केबल्सच्या माध्यमातूनच चालते.