

वॉशिंग्टन : वैद्यकीय शास्त्रज्ञांनाही थक्क करणारी एक अविश्वसनीय घटना अमेरिकेत घडली आहे. केवळ 21 आठवड्यांच्या गर्भधारणेनंतर जन्मलेल्या एका बाळाने जिवंत राहून जगातील सर्वात कमी दिवसांत जन्मलेले बाळ होण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावे केला आहे. नॅश कीन असे या चिमुकल्याचे नाव असून, त्याच्या जन्माची आणि जगण्याच्या संघर्षाची कहाणी थकक्क करणारी आहे.
गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस्ने नॅश कीनच्या जन्माविषयी माहिती दिली आहे. नॅश कीनचा जन्म 5 जुलै, 2024 रोजी अमेरिकेतील आयोवा शहरात झाला. त्याच्या जन्माची अपेक्षित तारीख तब्बल 133 दिवसांनी म्हणजेच सुमारे 19 आठवड्यांनी पुढे होती. जन्मावेळी त्याचे वजन फक्त 10 औंस (सुमारे 285 ग्रॅम) होते. या जुलै महिन्याच्या सुरुवातीला आपला पहिला वाढदिवस साजरा केल्यानंतर, त्याला अधिकृतपणे ‘सर्वाधिक कमी दिवसांत जन्मलेले बाळ’ म्हणून गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सने सन्मानित केले. त्याने 2020 मध्ये जन्मलेल्या मागील विक्रमवीर बाळाचा विक्रम केवळ एका दिवसाच्या फरकाने मोडला आहे.
जन्मानंतर नॅशची प्रकृती अत्यंत नाजूक होती. त्याला तब्बल सहा महिने आयोवा विद्यापीठाच्या ‘स्टेड फॅमिली चिल्ड्रन्स हॉस्पिटल’मधील नवजात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. या काळात त्याच्यावर अत्यंत गुंतागुंतीचे उपचार सुरू होते. कुटुंबीय त्याला प्रेमाने ‘नॅश पोटॅटो’ म्हणतात. अखेर जानेवारी 2025 मध्ये त्याला रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी मिळाली.
नॅशची आई, मोली कीन यांनी आपल्या भावना व्यक्त सांगितले की, खरं सांगायचं तर हे सर्व अविश्वसनीय वाटतं. एक वर्षापूर्वी, नॅशच्या भविष्याबद्दल आम्ही काहीच सांगू शकत नव्हतो आणि आज आम्ही त्याचा पहिला वाढदिवस साजरा केला आहे. हा क्षण खूप भावनिक आहे. त्याचा प्रवास इतरांपेक्षा खूप वेगळा होता याचं दुःख आहे, पण त्याहून अधिक अभिमान आहे. तो जन्मला तेव्हा लहान होता की, माझ्या छातीवर ठेवल्यावरही त्याचे अस्तित्व जाणवत नव्हते. तो पूर्णपणे वायर्स आणि मॉनिटर्सने वेढलेला होता. मी खूप घाबरले होते; पण जन्मानंतर तब्बल तीन आठवड्यांनी जेव्हा त्याला माझ्या छातीवर ‘स्किन-टू-स्किन कॉन्टॅक्ट’साठी ठेवण्यात आले, तेव्हा माझी सगळी भीती नाहीशी झाली. तो क्षण म्हणजे शुद्ध दिलासा आणि प्रेमाचा अनुभव होता.
मोली कीन यांच्या 20 आठवड्यांच्या तपासणीतच डॉक्टरांना आढळले की त्यांचे गर्भाशय दोन सेंटीमीटर उघडले आहे. त्यानंतर काही दिवसांतच त्यांना प्रसूती कळा सुरू झाल्या आणि नॅशचा जन्म झाला. आज नॅश घरी असून त्याची प्रकृती सुधारत आहे, मात्र त्याच्या शारिरीक विकासासाठी त्याला अजूनही काही अतिरिक्त उपचारांची गरज आहे.