

प्राग : शहरात राहणारे पक्षी सतत माणसांच्या गराड्यात असतात, मात्र हे पक्षी आपल्या जवळ येणाऱ्या व्यक्तींबाबत खूप निवडक असतात, असे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे. युरोपातील पाच देशांमधील शहरी पक्ष्यांच्या ३७ प्रजातींचा अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे की, पुरुषांच्या तुलनेत महिला जवळ आल्यास पक्षी अधिक लवकर उडून जातात.
’पीपल अँड नेचर’ या नियतकालिकात डिसेंबर २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासामध्ये संशोधकांनी ’फ्लाईट इनिशिएशन डिस्टन्स’ या मानकाचा वापर केला. याचा अर्थ, एखादा प्राणी किंवा पक्षी माणूस जवळ येत असताना किती अंतरावरून उडून जातो, यावरून त्याच्या भीतीचे मोजमाप केले जाते. संशोधकांना असे आढळले की, जेव्हा एखादी महिला पक्ष्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते, तेव्हा पक्षी अधिक सावध होतात आणि पुरुषांच्या तुलनेत जास्त अंतरावरूनच उडून जातात.
या अभ्यासाच्या सह-लेखिका आणि झेक युनिव्हर्सिटी ऑफ लाइफ सायन्सेसमधील पर्यावरणशास्त्रज्ञ यानिना बेनेडेटी यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ‘क्षेत्रावर काम करणारी महिला म्हणून मला हे पाहून आश्चर्य वाटले की पक्षी आमच्याकडे वेगळ्या नजरेने बघतात. प्राणी मानवांकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहतात, हे या अभ्यासातून स्पष्ट होते. अनेक वर्तणूक अभ्यासांमध्ये असे मानले जाते की निरीक्षक (माणूस) हा तटस्थ असतो, पण शहरी पक्ष्यांच्या बाबतीत तसे नसल्याचे दिसून आले.‘
हे निष्कर्ष गोंधळात टाकणारे असल्याचे इतर तज्ज्ञांचे मत आहे. युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनचे प्रोफेसर एमेरिटस जॉन मार्झलफ यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, पक्षी माणसांच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष देतात यात शंका नाही, पण ते महिलांनाच जास्त का घाबरतात, याचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे संशोधन प्राथमिक स्वरूपाचे असून, पक्ष्यांच्या या विचित्र वागण्यामागचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिक सखोल संशोधनाची गरज असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.