

झुरिच (स्वित्झर्लंड): आपल्या सूर्यमालेच्या टोकावर असलेल्या युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांना आतापर्यंत निव्वळ ‘आईस जायंटस्’ किंवा बर्फाचे महाकाय गोळे मानले जात होते. मात्र, एका नवीन ‘कॉम्प्युटेशनल मॉडेल’नुसार या ग्रहांचा अंतर्गत भाग वैज्ञानिकांच्या कल्पनेपेक्षा अधिक खडकाळ असण्याची शक्यता आहे. 10 डिसेंबर रोजी ‘अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
नेपच्यून हा सूर्यापासून सरासरी 2.8 अब्ज मैल (4.5 अब्ज किलोमीटर) अंतरावर असून तो सर्वात दूरचा ग्रह आहे. इतक्या प्रचंड अंतरावर असलेल्या अतिथंड तापमानामुळे हायड्रोजन, हेलियम आणि पाणी गोठून बर्फाचा जाड थर तयार होतो, असे आतापर्यंत मानले जात होते; परंतु झुरिच विद्यापीठातील संशोधक लुका मॉर्फ यांच्या मते, युरेनस आणि नेपच्यूनबद्दलची आपली माहिती अजूनही त्रोटक आहे. त्यांना केवळ ‘आईस जायंट’ म्हणणे हे वस्तुस्थितीचे सुलभीकरण करण्यासारखे आहे. लुका मॉर्फ आणि त्यांचे मार्गदर्शक रावीत हेलेड यांनी या ग्रहांचे अंतरंग समजून घेण्यासाठी एक नवीन तंत्र विकसित केले आहे.
दोन पद्धतींचा संगम : त्यांनी केवळ भौतिकशास्त्रावर आधारित गृहितके न मांडता निरीक्षणातून मिळालेली माहिती आणि भौतिकी नियम यांचा एकत्रित वापर केला. घनतेचा अभ्यास : ग्रहांच्या केंद्रापासून अंतराप्रमाणे त्यांच्या घनतेत होणारे बदल आणि गुरुत्वाकर्षण यांचा ताळमेळ बसवून हे मॉडेल तयार करण्यात आले. नवा निष्कर्ष : अनेक वेळा केलेल्या तांत्रिक चाचण्यांनंतर ग्रहांच्या केंद्रातील तापमान आणि त्यातील घटक यांची जी माहिती समोर आली, ती आतापर्यंतच्या निरीक्षणांशी तंतोतंत जुळते. युरेनस आणि नेपच्यूनचे चुंबकीय क्षेत्र अत्यंत विचित्र आणि गुंतागुंतीचे आहे. या ग्रहांच्या अंतरंगात बर्फाऐवजी खडकाळ पदार्थांचे प्रमाण जास्त असल्यास त्यांच्या या रहस्यमय चुंबकीय क्षेत्राचे स्पष्टीकरण देणे वैज्ञानिकांना सोपे जाणार आहे.