

नवी दिल्ली : डाळींना प्रोटिनचा खजिना मानले जाते. रोज एक वाटीभर (वरण नव्हे!) डाळ खाल्ल्यानं शरीराला अनेक फायदे होतात. उडद डाळीचे सेवन फक्त चवीसाठी नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. या डाळीत मोठ्या प्रमाणात प्रोटिन्स असतात. या डाळींमध्ये फायबर, व्हिटॅमीन बी कॉम्प्लेक्स, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, पोटॅशियम, फॉस्फरस, फोलेट असे अन्यही अनेक घटक आढळतात, ज्यांचा शरीराला मोठ्या प्रमाणात फायदा होतो.
उडदाच्या डाळीमध्ये उच्च फायबर असते जे पचन सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवून देण्यास मदत करते. तुम्हाला पचनाची समस्या असेल तर तुम्ही या डाळीचे सेवन करू शकता. उडदाच्या डाळीमध्ये कमी चरबी असते, जी कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होऊ शकते. उडदाच्या डाळीमध्ये अँटिऑक्सिडंट घटक असतात, जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात आणि रोगांचा धोका कमी करतात. उडदाची डाळ रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हे फायदेशीर आहे. उडदाच्या डाळीमध्ये कार्बोहायड्रेटस् असतात, जे शरीराला ऊर्जा पुरवण्यास मदत करतात. तुम्हालाही ऊर्जेची कमतरता जाणवत असेल तर ही डाळ तुमच्यासाठी उत्तम आहे. उडदाच्या डाळीमध्ये जास्त प्रमाणात फायबर आणि प्रोटिन असते. हे पोट जास्त काळ भरलेले राहण्यास आणि वजन नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त आहे.