

वॉशिंग्टन : एका महाविस्फोटातून ब्रह्मांडाचा प्रारंभ व विस्तार झाला, असे मानले जाते. त्यालाच ‘बिग बँग’ असे म्हणतात. ही अशी एक विस्फोटक घटना आहे, ज्यात काळ, अवकाश आणि वस्तुमानाचा जन्म एकाच क्षणी झाला आणि त्यातून आपले विश्व निर्माण झाले; पण ही खरीच सुरुवात होती का? आता एका नव्या संशोधनातून असे समोर आले आहे की, एका महाकाय कृष्णविवरातून विश्वाची निर्मिती झाली असावी!
‘फिजिकल रिव्ह्यू डी’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये नुकतेच प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, ‘बिग बँग’ ही घटना विश्वाची सुरुवात नसून एका गुरुत्वाकर्षणीय संकुचनाने (gravitational collapse) तयार झालेल्या अतिशय शक्तिशाली कृष्णविवरातून घडलेली एक प्रकारची ‘बाऊन्स’ घटना असावी. या संशोधनामागील कल्पना, ‘ब्लॅक होल युनिव्हर्स’ ही विश्वनिर्मितीविषयीची एक पारंपरिक कल्पनांना आव्हान देणारी; पण पूर्णपणे विद्यमान भौतिकशास्त्रावर आधारित मांडणी आहे. आतापर्यंतची प्रमुख ‘बिग बँग’ सिद्धांतावर आधारित ब्रह्मांडविद्या ( cosmology) आपल्याला विश्वाचा विकास कसा झाला, हे समजावून सांगते.
या मॉडेलमध्ये ‘कॉस्मिक इन्फ्लेशन’ म्हणजे विश्वाच्या सुरुवातीच्या क्षणी त्याचा प्रचंड वेगाने विस्तार झाला, असा घटक मांडला आहे; पण यासाठी अनेक अज्ञात आणि कधीही थेट न पाहिलेल्या संकल्पना वापराव्या लागतात, जसे की ‘इन्फ्लेटन फील्ड’ आणि ‘डार्क एनर्जी’. यामुळे मूलभूत प्रश्न अजूनही अनुत्तरितच राहतात. सर्व काही कुठून आले? हे असं का सुरू झालं? विश्वाची रचना अशीच का आहे? या नवीन मॉडेलमध्ये शास्त्रज्ञांनी पूर्णपणे वेगळी दिशा स्वीकारली आहे. त्यांनी बाहेरून विश्वाचा शोध घेण्याऐवजी ‘आत’ पाहिलं म्हणजेच जेव्हा अतिघन पदार्थ गुरुत्वाकर्षणामुळे संकुचित होतो तेव्हा काय घडतं? आपल्याला माहीत आहे की, तारे संकुचित होऊन कृष्णविवरात रूपांतरित होतात; पण कृष्णविवराच्या इव्हेंट होरायझनच्या आत काय असतं, हे आजही एक गूढ आहे.
1965 मध्ये रॉजर पेनरोज यांनी सिद्ध केलं की, विशिष्ट अटींनुसार गुरुत्वीय संकुचन अपरिहार्यपणे एक ‘सिंग्युलॅरिटी‘ म्हणजे अनंत घनतेचा बिंदू निर्माण करतं. हा सिद्धांत पुढे स्टीफन हॉकिंग यांनी विस्तारित केला आणि हेच विचार त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकात मांडले ‘अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम’. पेनरोज-हॉकिंग सिद्धांत हे क्लासिकल फिजिक्सवर आधारित आहेत, जे आपल्याला मोठ्या वस्तूंचं वर्तन समजावून सांगतं; पण अत्यंत घनतेच्या आणि अत्यंत सूक्ष्म पातळीवर, क्वांटम फिजिक्स लागू होते आणि तेच या नवीन मॉडेलमध्ये महत्त्वाचं आहे. संशोधकांच्या मते, जेव्हा कृष्णविवरातल्या सिंग्युलॅरिटीच्या जवळ क्वांटम प्रभावांचा विचार केला जातो, तेव्हा संकुचन थांबून उलट एक ‘बाऊन्स’ होतो आणि त्यातून नवीन अवकाश-कालाची (space- time) निर्मिती होते.