नवी दिल्ली : ब्रह्मांडात कोणकोणते पदार्थ आहेत आणि त्यांची टक्केवारी कशी आहे? याबाबत खगोलशास्त्रज्ञ दीर्घकाळापासून संशोधन करीत आहेत. यासंदर्भातील एका नव्या संशोधनानुसार आपले ब्रह्मांड हे मॅटर (पदार्थ) व ऊर्जेच्या संयोगापासून बनले आहे.
'अॅस्ट्रोफिजिकल जर्नल'मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातील माहितीनुसार आपल्या ब्रह्मांडात मॅटर 31.5 टक्के आहे. तर उर्वरित 68.5 टक्के भाग हा डार्क एनर्जीने तयार झाला आहे. 'डार्क एनर्जी' हे एक रहस्यमयी बल आहे. जे वेळेनुसार ब्रह्मांडाच्या विस्ताराला गती देण्यासाठी जबाबदार आहे. 1990 च्या दशकात शास्त्रज्ञांनी दीर्घ अंतरावरील सुपरनोवाला पाहून वरील अंदाज व्यक्त केला होता.
मॅटरची टक्केवारी जाणून घेण्यासाठी दुसरा आणखी एक पर्याय आहे. या संशोधनाचे नेतृत्व करणारे 'कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी'चे मोहम्मद अब्दुल्लाह यांच्या मते, आम्ही ज्या ब्रह्मांडाला पाहू शकतो, त्यामध्ये मॅटरचे प्रमाण हे सूर्याच्या दव्यमानापेक्षा 66 अब्ज पटीने जास्त आहे. मॅटरच्या सुमारे 80 टक्के भागाला 'डार्क मॅटर' म्हटले जाते. याबाबत अद्याप जास्त माहिती उपलब्ध नसली तरी यामध्ये असे 'सबअॅटॉमिक' कण आहेत की त्यांच्या अद्याप शोध लागलेला नाही. डार्क मॅटरबाबतच्या जुन्या व नव्या आकडेवारीचा मेळ बसत असल्याने यासंदर्भात अधिक संशोधन करणे आणखी सुलभ बनणार आहे.