Potassium Chloride unique crystal structure | वजनविरहित वातावरणात पोटॅशियम क्लोराईडच्या स्फटिकांची अनोखी रचना

‘नासा’चे अंतराळवीर डॉन पेटिट यांनी शेअर केले छायाचित्र
 Potassium Chloride unique crystal structure |
Potassium Chloride unique crystal structure | वजनविरहित वातावरणात पोटॅशियम क्लोराईडच्या स्फटिकांची अनोखी रचना
Published on
Updated on

वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अंतराळवीरांनी एका सामान्य रासायनिक संयुगाचा वापर करून स्फटिक तयार केला आहे. मात्र, पृथ्वीच्या कक्षाबाहेर (अंतरिक्षात) तयार झालेल्या या स्फटिकाने सर्वांनाच थक्क केले आहे. सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यावर हा स्फटिक एखाद्या नैसर्गिक रचनेऐवजी एखाद्या भविष्यातील आधुनिक शिल्पकृतीसारखा दिसतो.

नासाचे अंतराळवीर डॉन पेटिट यांनी १८ जुलै रोजी या स्फटिकाचे छायाचित्र आणि व्हिडीओ शेअर केला. 'पोटॅशियम क्लोराईड' चे हे स्फटिक मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये कसे आकार घेतात, हे यामध्ये दाखवण्यात आले आहे. पायऱ्या-पायऱ्यांच्या पिरॅमिडसारखी ही रचना आतल्या बाजूने दुमडलेली असून, अत्यंत शिस्तबद्ध आणि अनोखी दिसते. वैज्ञानिकांच्या मते, जेव्हा गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव संपतो, तेव्हा पदार्थांचा आकार असा बदलतो. बटलर युनिव्हर्सिटीतील रसायनशास्त्र आणि जैवरसायनशास्त्राच्या प्राध्यापिका ॲन विल्सन यांच्या माहितीनुसार, मायक्रोग्रॅव्हिटी म्हणजे पूर्णपणे शून्यावस्था नसून, पृथ्वीच्या तुलनेत तिथे गुरुत्वाकर्षण जवळजवळ दहा लाख पटीने कमी असते.

गुरुत्वाकर्षणातील या प्रचंड घटामुळे मानवी शरीरावर तर परिणाम होतोच; पण सोबतच द्रवपदार्थ आणि स्फटिकांचे वर्तनही पूर्णपणे बदलते. प्रा. विल्सन यांनी स्पष्ट केले की, जेव्हा गुरुत्वाकर्षण नगण्य होते, तेव्हा आण्विक आकर्षण आणि ध्रुवीयता यांसारखी इतर सूक्ष्म बले अधिक प्रभावी ठरतात. याच वातावरणामुळे पोटॅशियम क्लोराईडचा हा असा स्फटिक तयार होऊ शकला. पोटॅशियम क्लोराईड हे खाण्याच्या मिठाला (सोडियम) पर्याय म्हणून अन्नपदार्थांमध्ये आणि स्पोर्टस्‌ ड्रिंक्समध्ये वापरले जाणारे एक सामान्य मीठ आहे. परंतु, पृथ्वीवरील प्रयोगशाळांमध्ये असा स्फटिक तयार करणे अशक्यप्राय मानले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news