No road country | जगातील असा एकमेव देश जिथे शहरांना जोडणारे रस्तेच नाहीत!

No road country |
No road country | जगातील असा एकमेव देश जिथे शहरांना जोडणारे रस्तेच नाहीत!
Published on
Updated on

लंडन : जगातील जवळपास प्रत्येक देशात शहरांना जोडण्यासाठी रस्ते आणि हायवे (महामार्ग) बांधले जातात, जेणेकरून लोक कार, बस किंवा इतर वाहनांनी सोयीस्करपणे प्रवास करू शकतील. पण जरा विचार करा, जर एखाद्या देशात एका शहरातून दुसर्‍या शहरात जाण्यासाठी रस्ताच नसेल तर? ऐकायला हे खूप अजब वाटू शकते, पण जगात असा एक देश खरोखरच अस्तित्वात आहे, जिथे शहरांना जोडणारे रस्तेच नाहीत. येथे लोकांना प्रवासासाठी डॉग स्लेज, हेलिकॉप्टर, विमाने आणि बोटींचा आधार घ्यावा लागतो.

हा अनोखा देश म्हणजे ‘ग्रीनलँड’. जगातील सर्वात वेगळ्या ठिकाणांमध्ये ग्रीनलँडची गणना होते. बर्फाने वेढलेला हा देश आपल्या सौंदर्यासोबतच या आगळ्यावेगळ्या व्यवस्थेसाठी ओळखला जातो. येथील परिस्थिती अशी आहे की, लोक कार घेऊन एका शहरातून दुसर्‍या शहरात जाऊच शकत नाहीत. ग्रीनलँड हा देश अतिशय थंड हवामान आणि विशाल बर्फाच्छादित प्रदेशांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. या देशाचा सुमारे 80 टक्के भाग बर्फाच्या जाड चादरीने झाकलेला आहे. चहुबाजूला पसरलेले हिमनद्या, उंच पर्वत आणि खोल दर्‍या या जागेला इतर देशांपासून वेगळे बनवतात. याच भौगोलिक परिस्थितीमुळे येथे इतर देशांसारखे मोठे हायवे किंवा लांब रस्ते तयार होऊ शकलेले नाहीत.

छोट्या गावांमध्ये आणि शहरांच्या आत काही रस्ते नक्कीच आहेत, पण ते फक्त स्थानिक वापरापुरते मर्यादित आहेत. एका शहराला दुसर्‍या शहराशी जोडणारा एकही रस्ता येथे नाही. ग्रीनलँडमध्ये रस्ते न बनण्यामागे येथील हवामान आणि कठीण भूगोल कारणीभूत आहे. येथे वर्षातील बहुतांश काळ तीव— थंडी असते. हिवाळ्यात प्रचंड बर्फवृष्टी आणि बर्फाची वादळे येणे ही सामान्य बाब आहे. येथील लोकसंख्या खूप कमी असून लोक एकमेकांपासून खूप दूर अंतरावर राहतात. अशा परिस्थितीत हजारो किलोमीटर लांब रस्ते बनवणे अत्यंत कठीण मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, येथे रस्ते बांधण्यासाठी प्रचंड खर्च येईल आणि बर्फाच्या वादळांमुळे त्यांची देखभाल करणे हे मोठे आव्हान ठरेल.

रस्ते नसले तरी ग्रीनलँडमधील लोकांचे जीवन थांबत नाही. वाहतुकीसाठी त्यांनी इतर पर्याय शोधले आहेत. येथे हवाई प्रवास हा लोकांच्या जीवनाचा मुख्य भाग आहे. लहान विमाने आणि हेलिकॉप्टरद्वारे लोक एका शहरातून दुसर्‍या शहरात जातात. उन्हाळ्यात किंवा बर्फ वितळल्यावर अनेक ठिकाणी लोक बोटी आणि फेरी सेवांचा वापर करून समुद्राच्या मार्गाने प्रवास करतात. हिवाळ्यात जेव्हा चहुबाजूला बर्फ पसरतो, तेव्हा लोक ‘स्नोमोबाईल’ आणि ‘डॉग स्लेज’चा (कुर्त्यांद्वारे ओढली जाणारी बर्फावरील गाडी) वापर करतात. ही पारंपरिक श्वान गाडी आजही येथील जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news