Coral Reef Protection | सूर्यप्रकाशापासून प्रवाळ भित्तींच्या संरक्षणासाठी समुद्रतळाशी छत्र्या!

Coral Reef Protection |
Coral Reef Protection | सूर्यप्रकाशापासून प्रवाळ भित्तींच्या संरक्षणासाठी समुद्रतळाशी छत्र्या!
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टनः ग्लोबल वार्मिंगमुळे जगभरातील महासागरांचे तापमान कमालीच्या वेगाने वाढत आहे. या उष्णतेचा सर्वाधिक फटका समुद्रातील जीवसृष्टीचा महत्त्वाचा भाग असलेल्या ‘कोरल रीफ्स’ म्हणजेच प्रवाळ भित्तींना बसत आहे. जगातील प्रसिद्ध ‘ग्रेट बॅरियर रीफ’सह अनेक ठिकाणचे प्रवाळं नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर फ्लोरिडातील वैज्ञानिकांनी संकटात सापडलेल्या या प्रवाळ भित्तींना तात्पुरता दिलासा देण्यासाठी एक अत्यंत अनोखा मार्ग शोधून काढला आहे. हा मार्ग म्हणजे थेट समुद्राच्या तळाशी छत्र्या बसवणे! प्रवाळ भित्तींवर सूर्याची प्रखर किरणे थेट पडू नयेत म्हणून वैज्ञानिक त्यांच्यावर विशेष छत्र्यांचे आवरण घालत आहेत. यामुळे प्रवाळ क्षेत्रातील पाण्याचे तापमान नियंत्रित राहून तीव्र उष्णतेपासून त्यांचे रक्षण होत आहे.

वैज्ञानिकांनी २०२४ मध्ये फ्लोरिडाजवळील समुद्रात या प्रयोगाची यशस्वी चाचणी घेतली होती. या दरम्यान त्यांनी ‘ब्रेन कोरल’च्या दोन प्रजातींवर विशेष पद्धतीने तयार केलेल्या छत्र्यांसारख्या संरचना उभारल्या. या छत्र्यांमुळे समुद्रात प्रवाळांपर्यंत पोहोचणारा सूर्याचा प्रखर प्रकाश तब्बल ६० टक्क्यांनी कमी झाला, तसेच हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांनाही रोखण्यात यश आले. या प्रयोगानंतर असे दिसून आले की, ज्या प्रवाळांना छत्र्यांचे आवरण दिले होते, त्यांच्या रंगात फारसा फरक पडला नाही आणि त्यांचे नुकसान टळले; काही प्रवाळांनी तर आपला मूळ रंग पुन्हा प्राप्त केला.

याउलट, ज्या प्रवाळांना उघड्या उन्हात ठेवले होते, ते पूर्णपणे नष्ट झाले. जेव्हा पर्यावरणातील बदलांमुळे किंवा वाढत्या तापमानामुळे प्रवाळ आणि त्यांच्या उतींमध्ये राहणाऱ्या सूक्ष्म शैवालांमधील जैविक संबंध बिघडतात, तेव्हा प्रवाळ भित्ती नष्ट होण्यास सुरुवात होते. हे सूक्ष्म शैवाल प्रवाळांना आवश्यक असलेल्या ऊर्जेचा मोठा भाग पुरवतात आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रंगांसाठीही कारणीभूत असतात. मात्र, समुद्राचे पाणी असामान्यपणे गरम झाल्यावर प्रवाळ या शैवालांना शरीराबाहेर टाकून देतात. यामुळे प्रवाळांना मिळणारी ऊर्जा बंद होते, ते निष्क्रिय होतात आणि त्यांचा रंग उडून ते मृत पावतात. हा प्रयोग ‘नोव्हा साऊथईस्टर्न युनिव्हर्सिटी’च्या सागरी जीवशास्त्रज्ञ कॅरेन एल. नीली यांच्या नेतृत्वाखाली कॅरोलिन डेनिसन, कॅथरीन टोथ, एरेलिस चॅपरो आणि अँड्र्यू बेकर यांनी मिळून केला.

या छत्र्या विशेष पाईप्स आणि नायलॉनच्या कपड्यापासून बनवल्या गेल्या होत्या. समुद्राच्या तळाशी असलेल्या प्रवाळ वसाहतींपासून सुमारे ३० सेंटीमीटरवर त्या सुरक्षितपणे बसवण्यात आल्या. संपूर्ण समुद्राचे पाणी थंड करणे हा याचा उद्देश नव्हता, तर प्रवाळांपर्यंत पोहोचणारी प्रखर सूर्यकिरणे कमी करणे हा होता. अभ्यासातून स्पष्ट झाले की, या साध्या उपायामुळे सूर्याचा प्रकाश ६० टक्क्यांनी कमी झाला, ज्यामुळे तीव्र उष्णता आणि विकिरणांचा धोका टळून प्रवाळ विरंजन (Bleaching) रोखण्यात मोठे यश मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news