

सिडनी : ऑस्ट्रेलियातील पश्चिमेकडील जंगलांमध्ये एक अशी एक वनस्पती आढळते की ती अत्यंत दुर्मीळ आहे. तिला पाहणे जवळजवळ अशक्य आहे. कारण ती जमिनीखाली फुलते! रायझँथेला गार्डनेरी किंवा ‘अंडरग्राऊंड ऑर्किड’ असे या वनस्पतीचे नाव आहे. विशेष म्हणजे ही जगातील एकमेव अशी वनस्पती आहे जी संपूर्ण आयुष्य भूमिगत व्यतित करते.
प्रसिद्ध वनस्पतिशास्त्रज्ञ प्रोफेसर किंग्सली डिक्सन यांनी लहानपणी एका पुस्तकात या अंडरग्राऊंड ऑर्किडचे चित्र पाहिले. तेव्हापासून त्यांनी अंडरग्राऊंड ऑर्किड शोधण्याचा ध्यास घेतला. 24 व्या वर्षी एका मोहिमेदरम्यान त्यांनी चुकून जमिनीत पाय मारताच लालसर पाकळ्या दिसल्या आणि अधिक शोध घेतला असता त्यांना अंडरग्राऊंड ऑर्किडचे दर्शन झाले. आज मात्र हे ऑर्किड अत्यंत संकटात आहे. वर्षानुवर्षे केवळ तीन किंवा शून्य अशी त्याची जंगलात आढळणारी संख्या आहे. हवामान बदल, आग आणि अधिवास नाश ही मोठी कारणे आहेत.
हे ऑर्किड फुले, बिया, अंकुरण - सर्व काही जमिनीखालीच करते. त्याच्या जगण्यासाठी मेलाल्यूका नावाच्या झुडपाच्या मुळांशी जोडलेल्या बुरशीची (फंगस) गरज असते. झाड, बुरशी आणि ऑर्किड अशी तीन घटकांची जगण्याची साखळी आहे. त्यातील एक तुटले की सर्व नष्ट होते. डॉ. जॅकोपो कालेवो यांच्या संशोधनानुसार, अनेक ऑस्ट्रेलियन ऑर्किडस् उष्णतेला तोंड देऊ शकतात, मात्र वणवा आणि वारंवार लागणार्या नियंत्रित आगी यांच्या परिणामामुळे या ऑर्किडस्चा संपूर्ण नाश होऊ शकतो. एका संशोधनात आढळले की आगी नंतर बुरशी आणि झुडपे पुन्हा उगवतात, पण अतिप्रमाणात वारंवार आग लागल्यास पुनरुत्पादनाला वेळ मिळत नाही. 1990 च्या दशकात किंग्सली डिक्सन यांच्या टीमने प्रयोगशाळेत बुरशी, झुडपी आणि बीजांसह अंडरग्राऊंड ऑर्किड यशस्वीरित्या वाढवले होते, पण नंतर पाणी न दिल्यामुळे ते कोमेजून गेले. आज पुन्हा ते तसेच संयोजन करून नवीन वनस्पती वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.