

वॉशिंग्टन : एका नव्या वैज्ञानिक संशोधनानुसार, पृथ्वीच्या अनेक भागांत, विशेषतः किमान 30 अमेरिकन राज्यांमध्ये नैसर्गिक हायड्रोजनचे प्रचंड साठे जमिनीखाली दडलेले असल्याची शक्यता आहे. या साठ्यांचा शोध लागल्यास, जागतिक ऊर्जा संक्रमण (energy transition) वेगाने होऊ शकते. 13 मे रोजी Nature Reviews Earth and Environment या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार, पृथ्वीच्या भूपृष्ठाने गेल्या एक अब्ज वर्षांमध्ये इतका हायड्रोजन निर्माण केला आहे की, तो आजच्या ऊर्जेच्या गरजा तब्बल 1,70,000 वर्षे भागवू शकतो; पण या संपूर्ण हायड्रोजनचा किती भाग खरेदी योग्य आणि वापरासाठी काढता येईल, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.
पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली हायड्रोजन कसा निर्माण होतो, साठवला जातो आणि कोणत्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आढळतो, याविषयी आतापर्यंत शास्त्रज्ञांना तुकड्या तुकड्याचीच माहिती होती; पण आता ऑक्सफर्ड विद्यापीठाचे भू-रसायनशास्त्राचे प्राध्यापक क्रिस बॅलेंटाईन यांच्या नेतृत्वाखालील एका नव्या आढावा लेखाने हे कोडे सुटवण्यास सुरुवात केली आहे. ‘सध्या सगळ्यांचे लक्ष केंद्रीत आहे की, हायड्रोजन कुठे निर्माण झाला, कुठे साठवला गेला आणि कुठे टिकून राहिला आहे,’ असे बॅलेंटाईन यांनी सांगितले. संशोधनात भूगर्भात नैसर्गिक हायड्रोजन तयार होण्यासाठी आवश्यक भौगोलिक घटकांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यात मुख्यतः तीन घटकांची गरज असते: हायड्रोजनचा स्त्रोत, साठवणुकीसाठी खडक (reservoir rocks), हायड्रोजन गळून जाऊ नये म्हणून नैसर्गिक सील (natural seals). बॅलेंटाईन म्हणाले, ‘कोणत्याही प्रकारचा खडक जो पाण्याशी प्रतिक्रिया देऊन हायड्रोजन निर्माण करू शकतो, तो संभाव्य स्त्रोत ठरू शकतो.’ कॅन्सस राज्यातील Mid- Continental Rift नावाची एक भूगर्भीय रचना सध्या संशोधकांचे लक्ष वेधून घेत आहे. सुमारे 1 अब्ज वर्षांपूर्वी तयार झालेल्या या रिफ्टमध्ये मोठ्या प्रमाणावर बॅसाल्ट खडक साठले आहेत, जे पाण्याशी प्रतिक्रिया देऊन हायड्रोजन तयार करू शकतात. आता अशा संरचना शोधण्याचे काम सुरू आहे, जिथे हा हायड्रोजन साठवला गेला असेल.