

लंडन : ब्रिटनमध्ये केंटच्या फेव्हरशॅमजवळ असलेला ‘क्लिव्ह हिल सोलर पार्क’ ही एक भव्य रचना आहे. येथील अर्धा दशलक्षाहून अधिक सौर पॅनल जमिनीपासून सुमारे 9 फूट 10 इंच (3 मीटर) उंचीवर उभे आहेत. हा यूकेमधील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे आणि सध्या कार्यरत असलेल्या दुसर्या सर्वात मोठ्या सौर प्रकल्पापेक्षा जवळजवळ पाच पटीने मोठा आहे.
या प्रकल्पातून गेल्या पाच महिन्यांपासून वीज निर्मिती सुरू आहे. उन्हाळ्यामध्ये, काही वेळेस या प्रकल्पाने ग्रेट ब्रिटनच्या एकूण ऊर्जेच्या गरजांपैकी 0.7 टक्के इतकी वीज तयार केली. ब्रिटन सरकारने पुढील पाच वर्षांत सौर ऊर्जेचे प्रमाण दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ‘क्लिव्ह हिल’ हा पुढे येणार्या मेगा सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी एक महत्त्वाचा नमुना मानला जात आहे. 2020 मध्ये ‘क्लिव्ह हिल’ हा राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून सरकारी स्तरावर नियोजन मंजुरी मिळवणारा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प ठरला होता. तेव्हापासून, सरकारने अशा 11 NSIPs प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
नोव्हेंबरमधील ढगाळ दिवशीही हा पार्क 20,000 घरांना पुरेल इतकी वीज निर्माण करतो. ‘क्लिव्ह हिल’ची निर्मिती करणार्या ‘क्विनब—ुक’ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कीथ गेन्स म्हणाले की, विजेचे उत्पादन कार्बनमुक्त करण्यासाठी आणि ऊर्जा सुरक्षा प्रदान करण्यासाठी यूकेला अशा अनेक मोठ्या सौर प्रकल्पांची आवश्यकता आहे. ते म्हणाले, यूकेला ‘नेट झिरो’चे लक्ष्य गाठायचे असल्यास, मोठे प्रकल्प आवश्यक आहेत. मोठ्या प्रकल्पांमुळे ‘आम्हाला अनेक लहान प्रकल्पांपेक्षा स्वस्त दरात वीज निर्माण करणे शक्य होते.’ सरकारने 2030 पर्यंत आपले सौर ऊर्जेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी, ‘क्लिव्ह हिल’ (373 MW) आकाराचे सुमारे 80 सौर ऊर्जा प्रकल्प उभे करण्याची गरज आहे. केंटमधील रॉम्नी मार्श (Romney Marsh) येथे आणखी तीन मोठे सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहेत. गेल्या महिन्यात अॅशफोर्डजवळील 99.9 MW क्षमतेच्या ‘स्टोनस्ट्रीट ग्रीन सोलर पार्क’ला सरकारने मंजुरी दिली आहे.