

न्यूयॉर्क : युरोपियन अवकाश संस्था (ईएसए) आणि नासाची हेरा आणि युरोपा क्लिपर दोन प्रमुख अंतराळयाने आणि अंतराळातील 31/अॅटलास नामक अद्वितीय धूमकेतूच्या लांबट शेपटीतून जाणार आहेत. ही माहिती नासाने दिली आहे.
नासाने प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे की, 31/अॅटलास या धूमकेतूला आपल्या सौरमालेतून येणारी तिसरा अंतरतारकीय वस्तू म्हणून नोंदवले गेले आहे. या धुमकेतूची शेपटी मुख्यतः सौर वार्यामुळे निर्माण झालेल्या आयनकणांनी बनलेली आहे. ईएसए आणि नासाची दोन अंतराळयाने या धूमकेतूच्या आयनकणांचा अभ्यास करून, सौरमालेबाहेरील पदार्थांविषयी अनोखी माहिती मिळवतील. ईएसएचे हेरा हे अंतराळयान डियामोस आणि डिमोरपॉझ या द्विगुणी क्षुद्रग्रह प्रणालीकडे जात असताना, 25 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान धुमकेतूच्या शेपटीजवळून जाईल.
नासाचे युरोपा क्लिपर हे अंतराळ यान गुरु ग्रहाचा (ज्युपिटर) चंद्र युरोपाकडे जात असताना, 30 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान धूमकेतूच्या शेपटीजवळून प्रवास करेल. युरोपा क्लिपरमध्ये आयनीक कण व चुंबकीय क्षेत्र मोजण्यासाठी साधने आहेत. त्यामुळे या धूमकेतूच्या आयनकणांचा सखोल अभ्यास होण्याची शक्यता आहे.वैज्ञानिक दृष्टिकोनातून, या धुमकेतूची ही भेट सौरमालेबाहेरील पदार्थांचा अभ्यास करण्याची अनोखी संधी आहे. त्याच्या रासायनिक संघटनात निकेल-लोह गुणोत्तर जास्त असल्याचे निरीक्षण झाले आहे, तसेच प्रकाशाची विचित्र ध्रुवीकरणेही नोंदवली गेली आहेत. या आंतरराष्ट्रीय मिशन्समुळे अंतराळ संशोधनात नवीन उंची गाठली जाईल आणि सौरमालेच्या उत्पत्ती व विकासाबाबत नवीन माहिती मिळण्यास मदत होणार आहे.