

पापुआ, इंडोनेशिया : विज्ञानाच्या जगात एक अत्यंत दुर्मीळ आणि आनंदाची घटना घडली आहे. सुमारे 6,000 वर्षांपूर्वी पृथ्वीवरून पूर्णपणे नामशेष झाले आहेत असे मानले जाणारे दोन मार्सुपियल (पिशवी असलेले सस्तन प्राणी) न्यू गिनीच्या दुर्गम जंगलात सुखरूप आणि जिवंत आढळले आहेत. या प्राण्यांना शास्त्रज्ञांनी लाझारस टॅक्सा असे संबोधले आहे. बायबलमधील लाझारस या पात्राप्रमाणे, जे मृत्यूनंतर पुन्हा जिवंत झाले होते, त्याचप्रमाणे हे प्राणी हजारो वर्षांच्या काळानंतर पुन्हा समोर आले आहेत.
सापडलेल्या दोन प्राण्यांना शास्त्रज्ञांनी नावे दिली असून, त्यांच्या वैशिष्ट्यांचीही माहिती दिली आहे. त्यातील एकाचे नाव आहे पिग्मी लाँग-फिंगर्ड पोसम. हा प्राणी तळहाताच्या आकाराचा असून याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या हाताचे चौथे बोट अतिशय लांब असते. हे बोट वापरून तो झाडाच्या सडलेल्या खोडातून कीटकांच्या अळ्या बाहेर काढून खातो. अळ्यांचा आवाज ऐकण्यासाठी याचे कान देखील अत्यंत संवेदनशील असतात. दुसऱ्या प्राण्याचे रिंग-टेल्ड ग्लायडर असे नाव आहे. हा प्राणी झाडावरून हवेत झेप घेण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो. याची शेपटी फांद्यांना घट्ट पकडण्यासाठी सक्षम असते. न्यू गिनीमधील स्थानिक जमाती या प्राण्याला पवित्र मानतात आणि त्याला त्रास देत नाहीत, कदाचित यामुळेच तो इतकी वर्षे सुरक्षित राहू शकला, असे शास्त्रज्ञांना वाटते.
कसा लागला या प्राण्यांचा शोध?
प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ टिम फ्लॅनरी आणि क्रिस्टोफर हेल्गेन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने इंडोनेशियन पापुआ येथील व्होगेलकोप द्वीपकल्पात या दोन्ही दुर्मीळ प्राण्यांचा शोध लावला. यासाठी त्यांना स्थानिक आदिवासी समुदायांची मोलाची मदत झाली. शास्त्रज्ञांनी या भागातील दुर्गम डोंगराळ जंगलात कॅमेरा ट्रॅप्स लावून या प्राण्यांचे फोटो टिपले आहेत. यापूर्वी हे दोन्ही प्राणी केवळ ऑस्ट्रेलियात सापडलेल्या हजारो वर्षे जुन्या जीवाश्मांच्या माध्यमातूनच जगाला माहीत होते. जंगलातील वाढती वृक्षतोड आणि शिकारीमुळे या प्रजाती पुन्हा धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे शास्त्रज्ञांनी या प्राण्यांचे नेमके ठिकाण गुप्त ठेवले आहे, जेणेकरून वन्यप्राण्यांच्या तस्करांपासून त्यांचे रक्षण करता येईल.