

मेक्सिको सिटी : संशोधकांनी कॅरिबियनमधील दोन वेगळ्या बेटांवर राहणार्या मगरींच्या नव्या प्रजातींचा शोध लावला असून, या दोन्ही प्रजाती सध्या नामशेष होण्याच्या धोक्याच्या छायेखाली आहेत. मेक्सिकोच्या युकाटान द्वीपकल्पाजवळील कोझुमेल बेट आणि बांको चिनचोरो अॅटॉल या दोन बेटांवर या मगरी आढळल्या असून, अशा प्रत्येकी केवळ सुमारे 500 मगरी उरल्या आहेत, असे नवे संशोधन दाखवते.
या मगरींना यापूर्वी अमेरिकन क्रोकोडाइल (Crocodylus acutus) या प्रजातीचा भाग मानले जात होते. मात्र, मॅकगिल विद्यापीठातील (कॅनडा) संशोधक जोसे अविला-सर्वांतेस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जनुकीय अभ्यासात, कोझुमेल आणि बांको चिनचोरो येथील मगरींमध्ये इतर अमेरिकन मगरींपेक्षा ठळक आनुवंशिक फरक आढळले. त्यामुळे या बेटांवरील मगरींना स्वतंत्र प्रजाती म्हणून ओळखण्याची गरज असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. कोझुमेल बेटावरची मगरः शरीराच्या रचनेत विशिष्ट वैशिष्ट्ये; डोकीचे आकार इतरांपेक्षा लहान आणि वेगळ्या आकाराचे. बांको चिनचोरो अॅटॉलमधील मगरः डोक्याचा आकार मोठा आणि चपट्या आकाराचा; चवळ्या अधिक रुंद. हा अभ्यास Molecular Phylogenetics and Evolution या आंतरराष्ट्रीय शास्त्रीय जर्नलच्या जून अंकात प्रसिद्ध होणार आहे. संशोधकांनी मगरींचे रक्त व ऊती
(tissue) नमुने गोळा करून डीएनए विश्लेषण केले. यासोबतच, आधीच्या अभ्यासांतील जनुकीय माहितीचा आधार घेऊन, शारीरिक फरकांची तुलना केली. त्यातून या दोन प्रजाती ओळखण्यात यश मिळाले. या दोन प्रजाती आता विशेष लक्ष द्यावे लागणार्या संवेदनशील प्रजाती ठरत आहेत. त्यांचे अधिवास खूपच मर्यादित आहेत आणि प्रजातींची संख्या कमी असल्याने शहरीकरण, पर्यटन आणि प्रदूषण या मानवी हस्तक्षेपामुळे त्या नामशेष होण्याचा धोका वाढला आहे. संशोधक म्हणतात की, ‘सध्या या दोन प्रजाती तुलनात्मकद़ृष्ट्या स्थिर आहेत; पण त्यांची संख्या इतकी मर्यादित आहे की, कुठलीही नकारात्मक घटना त्या नष्ट होण्यापर्यंत पोहोचवू शकते.’