Two King Cobras Guard 72 Eggs | दोन किंग कोब्रांकडून एकाच घरट्यातील ७२ अंड्यांचे रक्षण!

Two King Cobras Guard 72 Eggs |
Two King Cobras Guard 72 Eggs | दोन किंग कोब्रांकडून एकाच घरट्यातील ७२ अंड्यांचे रक्षण!
Published on
Updated on

बीजिंग : घरटे बांधून अंडी घालणारा एकमेव सर्प म्हणजे किंग कोब्रा. जगातील या सर्वात मोठ्या विषारी सर्पाचे हे एक ठळक वैशिष्ट्य आहे. चीनमधील युन्नान प्रांतात ‘किंग कोब्रा’च्या तीन घरट्यांचा शोध लागला आहे. २०२० ते २०२५ दरम्यान शोधण्यात आलेल्या या घरट्यांमुळे किंग कोब्राच्या प्रजनन वर्तनाबाबत संशोधकांना अत्यंत दुर्मीळ व महत्त्वाची माहिती मिळाली आहे. या घरट्यांमध्ये अनुक्रमे ३०, ७२ आणि २५ अंडी सापडली. मात्र, कुन्मिंगजवळ सापडलेल्या सर्वात मोठ्या घरट्याने वैज्ञानिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे, कारण तेथे दोन प्रौढ किंग कोब्रा एकाच घरट्याचे आणि त्यामधील ७२ अंड्यांचे रक्षण करताना आढळले.

किंग कोब्राच्या घरटे बांधण्याच्या आणि अंड्यांचे रक्षण करण्याच्या सवयींबद्दल आतापर्यंत फार कमी माहिती उपलब्ध होती. त्यामुळे ‘इंटिग्रेटिव्ह कन्झर्व्हेशन’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासातील निष्कर्षांना अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. दक्षिण-पूर्व जिझांगच्या बाहेर या प्रजातीच्या घरट्यांची आणि अंड्यांच्या संख्येची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. किंग कोब्राचे पहिले घरटे १० जुलै २०२० रोजी दक्षिण युन्नानच्या जिशुआंगबाना दाई स्वायत्त प्रीफेक्चरमधील मेंघाई काउंटीमध्ये आढळले. १,७३० मीटर उंचीवर असलेल्या उष्णकटिबंधीय बांबूच्या जंगलात स्थानिक लोकांना हे घरटे दिसले.

बांबूच्या वाळलेल्या पानांपासून बनवलेल्या या घरट्याचे रक्षण एक किंग कोब्रा करत होता. संशोधकांच्या मते, ती मादी असावी. साप बाजूला झाल्यावर घरट्याची पाहणी केली असता त्यात ३० अंडी आढळली. टॉर्चच्या तीव्र प्रकाशात तपासणी केली असता, काही अंड्यांमध्ये भ्रुणाची वाढ होत असल्याचेही दिसून आले. दुसरे घरटे ६ जून २०२४ रोजी कुन्मिंगच्या पश्चिमेकडील एका मिश्र जंगलात सापडले. तिन्ही घरट्यांपैकी या घरट्यातून सर्वात अनोखी माहिती समोर आली. पाईनच्या सुकलेल्या पानांपासून तयार केलेल्या या घरट्याजवळ स्थानिक लोकांना दोन किंग कोब्रा दिसले. १ जुलै रोजी संशोधक पुन्हा त्या ठिकाणी गेले असता, दोन्ही साप अजूनही घरट्याचे रक्षण करत होते.

यातील एका सापाची लांबी १.८ मीटर, तर दुसऱ्याची २ मीटर होती. साप घरटे मोठे करत असल्यामुळे ते १ मीटर उंच आणि १.५ मीटर रुंद झाले होते. घरट्याच्या मध्यभागी तब्बल ७२ अंडी ठेवलेली होती. घरट्यांच्या आतील तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान होते, जे सभोवतालच्या तापमानापेक्षा खूप जास्त होते. एकाच घरट्याचे रक्षण करताना दोन किंग कोब्रा दिसणे हे शास्त्रज्ञांसाठी अत्यंत आश्चर्यकारक आहे, कारण या प्रजातीमध्ये घरट्याचे सामूहिक रक्षण करण्याचे वर्तन अद्याप निश्चित झालेले नाही. ११ जुलैच्या सर्वेक्षणादरम्यानही दोन्ही साप तेथेच होते; परंतु २० जुलैपर्यंत तेथे फक्त मोठा साप उरला होता. हे दोन्ही साप नर-मादीची जोडी होते की दोन माद्यांनी एकाच घरट्यात अंडी दिली होती, हे संशोधकांना स्पष्ट करता आले नाही. आधीच्या अभ्यासांनुसार किंग कोब्रा एका वेळी साधारणपणे १४ ते ३७ अंडी देतो. त्यामुळे युन्नानमध्ये एकाच घरट्यात ७२ अंडी सापडणे, हे वैज्ञानिक जगतासाठी एक मोठे गूढ ठरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news