

वॉशिंग्टन : ब्रह्मांडातील काही सर्वात रहस्यमयी आणि विचित्र मानल्या जाणार्या ‘डबल हॉट ज्युपिटर’ या ग्रहांच्या निर्मितीचे गूढ उलगडल्याचा दावा खगोलशास्त्रज्ञांनी केला आहे. या नव्या संशोधनामुळे अशा दुर्मीळ ग्रहांचा शोध घेण्यास मोठी मदत होईल, अशी आशा संशोधकांच्या टीमला वाटत आहे.‘हॉट ज्युपिटर’ हे आपल्या सूर्यमालेतील गुरू ग्रहाएवढे किंवा त्यापेक्षा मोठे वायूचे गोळे असतात. हे परग्रह आपल्या तार्याच्या इतके जवळून परिभ्रमण करतात की, त्यांचे एक वर्ष पृथ्वीच्या एका दिवसापेक्षाही कमी असू शकते.
हे ग्रह स्वतःच दुर्मीळ आहेत, कारण ते केवळ 1 टक्के तार्यांभोवती आढळतात; पण त्याहूनही दुर्मिळ आहेत ‘डबल हॉट ज्युपिटर’. हे ग्रह ‘बायनरी स्टार सिस्टीम’ म्हणजेच द्वैती तारा प्रणालीमध्ये (जिथे दोन तारे एकमेकांना प्रदक्षिणा घालतात) आढळतात. यात दोन्ही तार्यांभोवती प्रत्येकी एक ‘हॉट ज्युपिटर’ परिभ्रमण करत असतो. ही एक अत्यंत विचित्र रचना असून, ग्रह निर्मितीच्या सिद्धांतांना आव्हान देत असल्याने शास्त्रज्ञांसाठी ती एक मोठे कोडे ठरली होती. आता खगोलशास्त्रज्ञांच्या एका टीमला या कोड्याचे उत्तर सापडले आहे.
खगोलशास्त्रज्ञांच्या मते, द्वैती तारा प्रणालीच्या सामान्य आणि दीर्घकालीन उत्क्रांतीमुळे दोन्ही तार्यांभोवती नैसर्गिकरित्या ‘हॉट ज्युपिटर’ तयार होऊ शकतात. या टीमने ज्या प्रक्रियेचा अभ्यास केला, तिला ‘वॉन झिपल-लिडोव्ह-कोझाई ( ZLK) मायग्रेशन’ म्हणून ओळखले जाते. या सिद्धांतानुसार: द्वैती तारा प्रणालीमध्ये, एका तार्याचे गुरुत्वाकर्षण दुसर्या तार्याभोवती फिरणार्या ग्रहांच्या कक्षेवर परिणाम करते. लाखो वर्षांच्या या गुरुत्वाकर्षणाच्या खेळामुळे, विचित्र कक्षा किंवा कोन असलेल्या ग्रहांची दिशा बदलते. हे ग्रह हळूहळू आपल्या मूळ तार्याच्या दिशेने आत ओढले जातात आणि अखेरीस ‘हॉट ज्युपिटर’ बनतात.
येल युनिव्हर्सिटीच्या खगोलशास्त्रज्ञ आणि या टीमच्या प्रमुख, मलेना राईस यांनी सांगितले की, ‘ ZLK प्रक्रिया म्हणजे एक प्रकारचं नृत्यच आहे. द्वैती प्रणालीमध्ये, दुसरा तारा ग्रहांच्या कक्षांना आकार देऊ शकतो, त्यांना वाकवू शकतो, ज्यामुळे ग्रह आतल्या बाजूला स्थलांतर करतात.’ त्या पुढे म्हणाल्या, ‘आमच्या संशोधनातून आम्ही दाखवून दिले आहे की, द्वैती प्रणालीतील ग्रह एका आरशाप्रमाणे स्थलांतर प्रक्रिया अनुभवू शकतात, ज्यामुळे दोन्ही तार्यांना स्वतःचे ‘हॉट ज्युपिटर’ मिळतात.’ आपल्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी, राईस आणि त्यांच्या सहकार्यांनी येल सेंटर फॉर रिसर्च कॉम्प्युटिंगमधील ‘ग्रेस’ नावाच्या महासंगणकावर द्वैती तारे आणि दोन ग्रहांच्या उत्क्रांतीचे अनेक सिम्युलेशन केले. यासाठी त्यांनी नासाच्या ‘एक्सोप्लॅनेट आर्काइव्ह’ आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या ‘गाया’ या मोहिमेतून मिळालेल्या डेटाचा वापर केला. या संशोधनामुळे खगोलशास्त्रातील एका मोठ्या रहस्यावर प्रकाश पडला आहे.