

मुंबई : सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही हसवतात, काही आश्चर्यचकित करतात आणि कधी-कधी डोळ्यांवर विश्वास ठेवणेही कठीण होते. नुकताच असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये जंगलामध्ये दोन डोक्यांचा अजगर हळूहळू फिरताना दिसत आहे. हे दुर्मीळ द़ृश्य पाहून लोक हैराण झाले आहेत आणि हा व्हिडीओ खरा आहे की एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) च्या मदतीने बनवला आहे, असा प्रश्न विचारत आहेत. या अजगराची अनोखी स्थिती लोकांना प्रकृतीचा चमत्कार वाटत आहे.
व्हिडीओमध्ये अजगर जमिनीवरून हळूहळू सरकताना दिसतो. त्याचे शरीर सामान्य अजगराप्रमाणेच आहे, पण त्याला दोन डोकी आहेत, जी एकाच शरीराला जोडलेली आहेत. हे द़ृश्य पाहणार्यांना चकित करत आहे. तज्ज्ञांच्या मते, सापांमध्ये दोन डोकी असणे ही एक दुर्मीळ जैविक विकृती आहे, ज्याला बायसिफली (Bicephaly) म्हणतात. या स्थितीत शरीर एकच राहते पण दोन डोकी विकसित होतात. मात्र, असे जीव जास्त काळ जिवंत राहू शकत नाहीत आणि त्यांची काळजी घेणे अत्यंत कठीण असते.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (टि्वटर) वर @jamil2832 नावाच्या युजरने शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘निसर्गाचा करिष्मा पाहा. आतापर्यंत आपण शेपटी नसलेल्या सापाला दोन तोंडाचा मानत होतो, पण हा अजगर दोन्ही तोंडे एकाच दिशेला घेऊन फिरत आहे.’ व्हिडीओमध्ये दिसणारा हा पिवळा अजगर मूळतः मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत आढळतो. केवळ 28 सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत 13 हजारांहून अधिक वेळा पािहिला गेला आहे. शेकडो लोकांनी तो लाईक केला असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, ‘हा खरा आहे यावर विश्वास बसत नाही, एखाद्या चित्रपटातील सीन वाटतोय.’ दुसर्याने लिहिले, ‘प्रकृतीचा चमत्कार पाहून आश्चर्य वाटते.’ अनेक लोक याला ‘एआय’ ने बनवलेला व्हिडीओ सांगत आहेत; परंतु व्हिडीओ शेअर करणार्याने स्पष्ट केले आहे की हा खरा अजगर आहे आणि तो जंगलातच पाहिला गेला.