

कैरो : इजिप्तमधील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात काम करत असताना एका थक्क करणाऱ्या शोधाला गवसणी घातली आहे. उत्तर इजिप्तमधील एका गावात शेतात माती उपसण्याचे काम सुरू असताना फॅरो (राजा) रॅमेसेस द्वितीय याच्या दोन महाकाय पुतळ्यांचे अवशेष सापडले आहेत.
खालिद अल-शहात असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्याने तातडीने इजिप्तच्या पर्यटन आणि पुरातत्त्व मंत्रालयाला याची माहिती दिली. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यानंतर एका तज्ज्ञ पथकाला बेहबेइत एल हगार गावात पाठवून या पुतळ्यांचे उत्खनन व अभ्यास सुरू करण्यात आला आहे. रॅमेसेस द्वितीय याने इजिप्तच्या इतिहासात सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या राज्यकाळांपैकी एक अनुभवला आहे. त्याने इसवी सन पूर्व अंदाजे १२७९ ते १२१३ दरम्यान राज्य केले. त्याच्या ६६ वर्षांच्या सत्ताकाळात इजिप्त साम्राज्याची सीमा पूर्वेकडे सध्याच्या सीरियापर्यंत पसरली होती. त्याने संपूर्ण साम्राज्यात अनेक वास्तुकला प्रकल्पांना सुरुवात केली होती, ज्यामुळे इजिप्तमध्ये यापूर्वीही रॅमेसेस द्वितीयचे अनेक पुतळे सापडले आहेत.
कैरो विद्यापीठातील इजिप्त अभ्यासक महमूद इमाम यांनी सांगितले की, बेहबेइत एल हगार हे गाव आरोग्य आणि जादूची देवी मानल्या जाणाऱ्या आयसिसच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असून, यापूर्वीही येथे रॅमेसेस द्वितीयच्या नावाचे वास्तुकलेचे तुकडे सापडले होते. नव्याने सापडलेले हे पुतळे मंदिराच्या पश्चिमेकडील भागात उत्खननातून बाहेर काढण्यात आले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. नव्याने सापडलेले दोन्ही पुतळे एकेकाळी प्रचंड आकाराचे होते. त्यापैकी मोठा पुतळा मूळ बांधणीच्या वेळी जवळपास २८ फूट (८.५ मीटर) उंच असावा असा अंदाज आहे. मात्र, सध्या या पुतळ्याचा प्रामुख्याने केवळ ५.२ फूट (१.६ मीटर) उंच असलेला शिरभाग शिल्लक आहे. यामध्ये फॅरो राजाने उच्च आणि निम्न इजिप्तचा दुहेरी मुकुट घातल्याचे दिसून येते.
या मोठ्या पुतळ्याच्या पाठीमागील खांबावर चित्रलिपीतील (हायड्रोग्लिफिक्स) कोरीव काम आढळले आहे, ज्यामध्ये राजाचे ‘होरस’ नाव दिले आहे: ‘होर-का-नख्त-मेरी-मात’. याचा अर्थ ‘बलवान वृषभ, सत्याचा आणि न्यायाचा लाडका’ असा होतो, अशी माहिती युनायटेड किंगडममधील मँचेस्टर विद्यापीठाच्या पुरातत्त्वशास्त्राच्या प्राध्यापक जॉयस टिल्ड्सले यांनी त्यांच्या ‘रॅमेसेस: इजिप्त्स ग्रेटेस्ट फॅरो’ (पेंग्विन बुक्स, २००१) या पुस्तकात दिली आहे. इजिप्तमध्ये फॅरो राजांना अनेक पर्यायी नावे असण्याची प्रथा होती, ज्यामध्ये आकाश देवता होरसच्या सन्मानार्थ ‘होरस’ नाव दिले जात असे. दुसरा पुतळा सुमारे ७.९ फूट (२.४ मीटर) उंच असून, तोदेखील रॅमेसेस द्वितीयचाच असावा, असे मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. या पुतळ्यात राजाने ‘नेमेस’ शिरस्त्राण (फॅरो राजघराण्यातील लोकांनी घालायचे पट्टेरी डोक्याचे कापड) परिधान केल्याचे दिसून येते, अशी नोंद ‘इजिप्त एक्स्प्लोरेशन सोसायटी’ने आपल्या संकेतस्थळावर केली आहे.