

बगदाद : जगातील ‘मानवी संस्कृतीचा पाळणा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेसोपोटेमियाच्या संस्कृतीला ज्या नदीने समृद्ध केले, त्या ऐतिहासिक युफेटिस नदीचा जन्म नेमका कसा झाला, याचा उलगडा शास्त्रज्ञांनी केला आहे. एका नवीन अभ्यासानुसार, या नदीचा जन्म सुमारे ३६ लाख (३.६ दशलक्ष) वर्षांपूर्वी इतर दोन प्राचीन नद्यांच्या प्रवाहांच्या एकत्र येण्यातून झाला होता. तेव्हापासून आजपर्यंत या संपूर्ण प्रदेशाचा भूगोल आणि इतिहास बदलून टाकणाऱ्या या नदीबद्दलचा सविस्तर अभ्यास नुकताच समोर आला असून, शास्त्रज्ञांनी तिच्या उगम आणि प्रवासाचे अनेक रंजक पैलू उलगडले आहेत.
युफ्रेटिस नदी ही मेसोपोटेमियाच्या प्राचीन संस्कृतीचा मुख्य आधारस्तंभ राहिली आहे. नव्या भूगर्भीय अभ्यासानुसार, सुमारे ३६ लाख वर्षांपूर्वी या भागात वाहणाऱ्या दोन वेगवेगळ्या प्राचीन नद्यांचे प्रवाह निसर्गातील मोठ्या भौगोलिक बदलांमुळे एकमेकांना मिळाले. या दोन नद्यांच्या एकत्र येण्यातूनच एका महाकाय नदीचा जन्म झाला, जिला आज आपण ‘युफ्रेटिस’ म्हणून ओळखतो. इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्रात युफ्रेटिस आणि तैग्रीस नद्यांमधील प्रदेशाला ‘मेसोपोटेमिया’ म्हणजेच मानवी संस्कृतीचा पाळणा म्हटले जाते.
या नदीच्या सुपीक खोऱ्यामुळेच मानवाने शिकारी जीवन सोडून पहिल्यांदा शेती करायला सुरुवात केली. जगातील पहिली मानवी चक्रे, लेखन पद्धती आणि सुमेरियन, बॅबिलोनियन व असीरियनसारख्या प्रगत संस्कृती याच नदीच्या काठावर बहरल्या. शास्त्रज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि भूगर्भीय नमुन्यांचा अभ्यास करून हे स्पष्ट केले आहे की, लाखो वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपाच्या हालचाली आणि हवामानातील बदलांमुळे या नद्यांचे मार्ग बदलले. या प्रक्रियेमुळे नदीला बारमाही पाण्याचा मोठा स्त्रोत मिळाला, ज्यामुळे अत्यंत प्रतिकूल आणि वाळवंटी भागातही ही नदी हजारो वर्षे अविरत वाहत राहिली.