दा विंचीच्या स्केचप्रमाणेच ‘या’ किल्ल्यात सापडले बोगदे!

दा विंचीच्या स्केचप्रमाणेच ‘या’ किल्ल्यात सापडले बोगदे!
File Photo
Published on
Updated on

मिलान : ‘मोनालिसा’सारखी अजरामर कलाकृती बनवणारा इटालियन कलाकार लिओनार्डो दा विंची हा एक हरहुन्नरी माणूस होता. संशोधक, अभियंता, चित्रकार, शिल्पकार असे त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. दा विंचीच्या प्रसिद्ध कलाकृतींचाच नव्हे, तर त्याच्या अनेक साध्या वाटणार्‍या स्केचेसचाही अनेक बाबतीत आजही अभ्यास केला जात असतो. त्याच्या एका स्केचमध्ये इटलीच्या मिलान शहरातील स्फोर्जा किल्ल्याखाली असलेल्या गुप्त बोगद्यांचे चित्रण होते. आता तिथे असे बोगदे खरोखरच असल्याचे निष्पन्न झाले आहे.

दा विंचीने हे स्केच सन 1495 च्या आसपास बनवले होते. त्यामध्ये त्याने दर्शवलेल्या बोगद्यांबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद होते. मात्र, आता संशोधकांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या बोगद्यांचे खरोखरच अस्तित्व असल्याचे शोधले आहे. मिलानच्या पॉलिटेक्निक यूनिव्हर्सिटीतील संशोधकांनी किल्ल्याचे अधिकारी तसेच ‘कॉडेविंटेक इटालियाना’ या इंजिनिअरिंग कंपनीच्या साथीने याबाबतचे संशोधन केले. त्यांनी किल्ल्याच्या संपूर्ण संरचनेचे डिजिटल स्कॅन तयार केले आणि त्यामधील अशा हिश्श्यांचीही नोंद केली जे पाचशेपेक्षाही अधिक वर्षांपासून छुपे होते. या संशोधनासाठी लेसर स्कॅनिंग, जीपीएस तंत्रज्ञान आणि ग्राऊंड-पेनिट्रेटिंग रडार (जीपीआर) चा वापर करण्यात आला. त्यामधून आढळले की, दा विंचीच्या स्केचमध्ये दाखवलेले बोगदे वास्तवात स्फोर्जा किल्ल्यात अस्तित्वात आहेत. स्फोर्जा किल्ल्याचे बांधकाम सन 1358 मध्ये झाले. मात्र, वेळोवेळी तो नष्ट करण्यात आला आणि पुन्हा बनवण्यात आला.

सध्या या किल्ल्याचा एक षष्ठांश भागच शिल्लक आहे. सन 1400 च्या आसपास तो नष्ट करण्यात आल्यानंतर मिलानच्या ड्यूक फ्रांसिस्को स्फोर्जा यांनी त्याच्या पुनर्बांधणीचा आदेश दिला. स्फोर्जा यांचा सन 1466 मध्ये मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मुलगा लुडोविको स्फोर्जा याने हे बांधकाम पुढे सुरू ठेवले आणि लिओनार्डो दा विंचीसारख्या महान कलाकाराला किल्ल्याची सजावट आणि निर्मितीच्या कामात समाविष्ट केले. दा विंचीने या काळात अनेक चित्रे व डिझाईन्स बनवली. त्यामध्ये किल्ल्याच्या सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित काही महत्त्वपूर्ण स्केचेस समाविष्ट आहेत. दा विंची हा आपल्या अचूकतेसाठीही ओळखला जातो. मात्र, तरीही कालांतराने किल्ल्यामध्ये त्याच्या स्केचमधील भुयार किंवा बोगदे आढळले नव्हते. त्यामुळे ते खरोखरच अस्तित्वात आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला होता. या बोगद्यांचा उद्देश किल्ल्याच्या सुरक्षेसाठी असू शकतो. सैन्याच्या हालचाली व शत्रूवर नजर ठेवण्यासाठी ते बनवले होते. काही गुप्त रस्ते आणीबाणीच्या वेळी वापरण्यासाठी बनवले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news