

ओटावा : लवकरच हृदयाची तपासणी करण्यासाठी रुग्णालयात जाण्याची गरज कमी होऊ शकते. येथील संशोधकांनी एक अत्याधुनिक एआय-आधारित टी शर्ट विकसित केला आहे, जो अनेक दिवस सतत हृदयाच्या ठोक्यांवर नजर ठेवू शकतो. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे लपून राहणार्या आणि अचानक जीवघेणा ठरू शकणार्या आनुवंशिक हृदय लय विकारांचा वेळेत शोध घेणे.
सामान्यतः रुग्णालयात केली जाणारी ईसीजी चाचणी काही मिनिटांची असते, त्यामुळे हृदयातील तात्पुरते बदल लक्षात येत नाहीत. पण हा स्मार्ट टी शर्ट 50 पर्यंत सेन्सर्सच्या मदतीने सतत डेटा गोळा करतो आणि एआय तंत्रज्ञान त्याचे विश्लेषण करून धोका ओळखतो. विशेषतः ब्रुगाडा सिंड्रोमसारख्या विकारांचे निदान करण्यात तो उपयुक्त ठरू शकतो.
ब्रिटिश हार्ट फाऊंडेशनच्या मदतीने या संशोधनात 1000 हून अधिक लोकांचा डेटा वापरण्यात आला आहे. पुढील टप्प्यात सुमारे 200 स्वयंसेवक तीन महिन्यांपर्यंत हा टी-शर्ट वापरणार आहेत. तज्ज्ञांच्या मते, ही तंत्रज्ञान पुढील पाच वर्षांत प्रत्यक्ष वापरात येऊ शकते. यामुळे हृदयविकाराचे निदान अधिक लवकर होऊन अनेकांचे जीव वाचू शकतील.