

वॉशिंग्टन : परग्रहावरील जीवांच्या आणि उडत्या तबकड्यांच्या (युफो) शोधात असलेल्या लोकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एका धातूच्या तुकड्याला ‘युफो’चा भाग समजून अनेक दशकांपासून सुरू असलेला सस्पेन्स आता संपला आहे. अमेरिकन लॅबमधील शास्त्रज्ञांनी केलेल्या सखोल तपासणीत हा तुकडा परग्रहावरून आलेला नसून, तो पृथ्वीवरच तयार करण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे.
अनेक वर्षांपासून असा समज होता की, हा धातूचा तुकडा एखाद्या उडत्या तबकडीचा भाग आहे. या धातूमध्ये गुरुत्वाकर्षणाविरुद्ध काम करण्याची आणि हवेत तरंगण्याची ‘जादुई’ शक्ती असल्याचा दावा ‘युफो’ प्रेमींकडून केला जात होता. मात्र, ‘ओक रिज नॅशनल लॅब’च्या शास्त्रज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेल्या चाचणीत हा दावा फेटाळून लावला आहे. हा धातूचा तुकडा 1947 मधील प्रसिद्ध ‘रोसवेल’ घटनेमुळे चर्चेत आला होता. त्यावेळी अमेरिकेच्या रोसवेलमध्ये एक उडती तबकडी कोसळल्याची अफवा पसरली होती.
जरी अमेरिकन लष्कराने तो हवामान मोजणारा फुगा असल्याचे सांगितले होते, तरीही लोक त्याला एलियन्सशी जोडून पाहात होते. हा तुकडा त्याच घटनेचा अवशेष असल्याचे मानले जात होते. 2022 मध्ये या धातूच्या तुकड्याची सत्यता तपासण्यासाठी तो सरकारी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला. शास्त्रज्ञांनी यामध्ये एलियन्सच्या तंत्रज्ञानाचे किंवा अंतराळातील कोणत्याही अनोख्या पदार्थाचे निशाण शोधण्याचा प्रयत्न केला.
तपासाचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत. मूळ घटक : यात असलेले मॅग्नेशियम आणि शिसे हे अगदी तशाच प्रकारचे आहेत, जसे पृथ्वीवर आढळतात. जादुई शक्तीचा अभाव : यात हवेत उडण्याची कोणतीही अलौकिक क्षमता आढळली नाही. खरे स्वरूप : ‘पॉप्युलर मेकॅनिक्स’च्या अहवालानुसार, हा धातू दुसऱ्या महायुद्धानंतर विमानांच्या निर्मितीसाठी केलेल्या प्रयोगांचा एक भाग असावा. अनेक वर्षांच्या कुतूहलानंतर आता हे स्पष्ट झाले आहे की, हा तुकडा मानवनिर्मित असून विमानांच्या प्रयोगांशी संबंधित आहे. यामुळे एलियन्सच्या मशिनचा भाग सापडल्याच्या आशेवर असलेल्या लोकांची काहीशी निराशा झाली असली, तरी विज्ञानाने पुन्हा एकदा सत्याचा उलगडा केला आहे.