

वॉशिंग्टन : ट्रिपल-निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर (Triple- Negative Breast Cancer-TNBC) हे नाव ऐकताच लोकांच्या मनात भीती निर्माण होते. हे स्वाभाविक आहे. कारण, हा स्तनाच्या कर्करोगाचा एक धोकादायक प्रकार आहे. या कर्करोगात असे रिसेप्टर्स नसतात, ज्यांच्यावर सामान्य औषधे प्रभावी ठरतात. त्यामुळे याचा उपचार केवळ केमोथेरपीने केला जातो, तरीही हा कर्करोग पुन्हा होण्याची शक्यता असते. आता शास्त्रज्ञांनी या कर्करोगावर ‘अल्फा-लॅक्टाल्ब्युमिन’ (Alpha- lactalbumin) नावाची लस विकसित केली आहे. ही नवीन लस कर्करोगाच्या पेशींना कायमस्वरूपी नष्ट करू शकेल आणि एकदा बरा झाल्यावर हा आजार पुन्हा होणार नाही, अशी आशा आहे. यामुळे प्रत्येक TNBC रुग्णाला आशेचा एक नवा किरण मिळाला आहे.
ग्लोबोकॉन (Globocon 2020) च्या आकडेवारीनुसार, भारतात दर 8 मिनिटाला एक महिला स्तनाच्या कर्करोगामुळे मरण पावते. यानुसार, ही लस लाखो महिलांसाठी वरदान ठरू शकते. डॉ. जस्टिन जॉन्सन यांनी सांगितले की, ‘ही लस सुरक्षित आहे आणि तिने शरीरात प्रतिकारशक्ती विकसित केली आहे, जे एक मोठेच यश आहे.’ डॉ. जी थॉमस बड यांनीही सांगितले की, हे परिणाम अल्फा-लॅक्टाल्ब्युमिन लसीला पुढील चाचण्यांसाठी पुढे नेण्यास मदत करतात. क्लीव्हलँड क्लिनिकचे प्रमुख संशोधक डॉ. जी. थॉमस बड, एमडी यांच्या मते, ट्रिपल-निगेटिव्ह स्तनाच्या कर्करोगावर उपचार करणे आजही सर्वात कठीण आहे. त्यांनी पुढे सांगितले की, ‘हे प्राथमिक परिणाम आशादायक आहेत. ही लस केवळ सुरक्षितच नाही, तर तिने 74 टक्के रुग्णांमध्ये मजबूत प्रतिकारशक्ती सुरू केली आहे.’
नवी लस कशी काम करते?
ही नवीन लस केमोथेरपीप्रमाणे थेट कर्करोगाच्या पेशींना नष्ट करत नाही. तिचे मुख्य लक्ष रुग्णाची रोगप्रतिकार प्रणाली प्रशिक्षित करणे आहे, जेणेकरून ती कर्करोगाच्या पेशींना ओळखू शकेल. ही लस कर्करोगाशी संबंधित प्रोटिनला (अँटीजेन) प्रतिकारक पेशींसमोर सादर करते, ज्यामुळे त्या कर्करोगाविरुद्ध प्रतिक्रिया सुरू करू शकतात आणि रोगाला मुळापासून नष्ट करू शकतात.