

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील विषारी हवा केवळ मानवांसाठीच नव्हे, तर झाडांसाठीही अत्यंत घातक ठरत आहे. या प्रदूषणामुळे झाडांमधील हरितद्रव्य (क्लोरोफिल) कमी होत असून, त्याचा थेट परिणाम झाडांच्या ऑक्सिजन निर्माण करण्याच्या क्षमतेवर होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष दिल्ली विद्यापीठाच्या एका अभ्यासात समोर आला आहे.
दिल्ली विद्यापीठाच्या आचार्य नरेंद्र देव महाविद्यालयातील संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. यासाठी शहरातील विविध भागांत आढळणार्या 10 प्रमुख वृक्ष प्रजातींचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये बेल, सप्तपर्णी, कडुलिंब, बहावा (अमलतास), वड, पिंपळ, पिलखन, आंबा, चाफा आणि जांभूळ यांसारख्या परिचित झाडांचा समावेश होता. ‘सीझनल व्हेरिएशन ऑफ बायोकेमिकल अँड मॉर्फोलॉजिकल ट्रेटस् ऑफ सिलेक्टेड ट्री स्पीसीज इन पोल्युटेड अर्बन एरियाज ऑफ दिल्ली सिटी’ या शीर्षकाखालील हा अभ्यास दिल्लीतील चार वेगवेगळ्या झोनमध्ये करण्यात आला.
यामध्ये आश्रम (अत्यंत प्रदूषित रस्ता), तुघलकाबाद (औद्योगिक क्षेत्र), द्वारका (मध्यम प्रदूषित निवासी क्षेत्र) आणि कमला नेहरू रिज (सर्वात कमी प्रदूषित शहरी जैवविविधता पार्क) या भागांचा समावेश होता. अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे की, ज्या भागात प्रदूषणाची पातळी जास्त आहे, तेथील झाडांच्या पानांमधील हरितद्रव्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. हरितद्रव्य हे झाडांच्या प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी आणि ऑक्सिजन निर्मितीसाठी अत्यावश्यक असते.