

न्यूयॉर्क : प्रगत अवस्थेतील प्रोस्टेट कॅन्सर (मेटॅस्टॅटिक कास्ट्रशन-रेझिस्टन्स प्रोटेस्ट कॅन्सर -एमसीआरपीसी) असलेल्या रुग्णांसाठी एक महत्त्वाची वैद्यकीय माहिती समोर आली आहे. रुग्णाच्या रक्तातील सर्क्युलेटिंग ट्यूमर सेल्समधील गुणसूत्रांमधील दोष तपासून, त्याला कोणता उपचार लागू पडेल हे आधीच ओळखणे आता शक्य होणार आहे.
या संशोधनात अशा रुग्णांचा समावेश करण्यात आला होता ज्यांच्यावर एंझाल्युटामाइड किंवा अबिरॅटेरॉन सारख्या औषधांचा परिणाम होणे बंद झाले होते. अशा वेळी रुग्णांना कॅबाझिटॅक्सेल हे केमोथेरपीचे औषध द्यावे की दुसरे संप्रेरक उपचार द्यावे, हा मोठा प्रश्न डॉक्टरांसमोर असतो. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी वैज्ञानिकांनी रक्तातील कर्करोग पेशींमधील क्रोमोसोमल इन्स्टॅबिलिटी (गुणसूत्रांमधील अस्थिरता) तपासली.
संशोधनातील महत्त्वाचे निष्कर्ष
अल्प आयुष्यमान : ज्या रुग्णांच्या पेशींमध्ये गुणसूत्रांची अस्थिरता जास्त होती, त्यांचे सरासरी आयुष्यमान 8.9 महिने आढळले, तर ज्यांच्यात ही अस्थिरता कमी होती, त्यांचे आयुष्यमान 15.3 महिने इतके जास्त होते.
केमोथेरपीचा प्रभाव : ज्यांच्या रक्तातील पेशींमध्ये सुरुवातीलाच गुणसूत्रांचे दोष आढळले, त्यांना कॅबाझिटॅक्सेल या केमोथेरपीचा फारसा फायदा झाला नाही. हे टॅक्सेन प्रकारच्या केमोथेरपीला असलेल्या प्रतिकाराचे लक्षण मानले जाते.
या संशोधनामुळे आता डॉक्टरांना बायोमार्कर चाचणीद्वारे हे ठरवता येईल की, संबंधित रुग्णाला केमोथेरपीचा फायदा होईल की नाही. यामुळे रुग्णांचा वेळ वाचेल आणि ज्या उपचारांचा उपयोग होणार नाही, त्यापासून होणारे दुष्परिणाम टाळता येतील. तज्ज्ञांच्या मते, रक्तावर आधारित ही चाचणी प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांसाठी एक प्रभावी मार्गदर्शक ठरेल. या शोधपत्रिकेत हे संशोधन प्रसिद्ध झाले असून, भविष्यात कॅन्सर उपचार अधिक वैयक्तिकृत होण्यास यामुळे मदत होईल.