Gold coin treasure Russia | रशियात घराच्या पायाखाली सोन्याच्या नाण्यांचा खजिना

Gold coin treasure Russia |
Gold coin treasure Russia | रशियात घराच्या पायाखाली सोन्याच्या नाण्यांचा खजिना
Published on
Updated on

मॉस्को : वायव्य रशियातील तोरझोक शहरात पुरातत्त्वशास्त्रज्ञांना एका जुन्या घराच्या पायाखाली सोन्याच्या नाण्यांचा मोठा साठा सापडला आहे. सुमारे 100 वर्षांपूर्वीचा हा खजिना रशियन साम्राज्याच्या अस्ताच्या काळातील असून, आजच्या बाजारभावानुसार त्याची किंमत 5 लाख डॉलरपेक्षा (अंदाजे 4.15 कोटी रुपये) जास्त असण्याची शक्यता आहे.

रशियन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या पुरातत्त्व संस्था आणि ‘ऑल-रशियन हिस्टोरिकल अँड एथनोग्राफिक म्युझियम’च्या संशोधकांनी 5 मार्च रोजी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे. सेंट पीटर्सबर्गपासून आग्नेयेला सुमारे 420 किलोमीटर अंतरावर असलेल्या तोरझोक शहरात नवीन बांधकामापूर्वी जुन्या ऐतिहासिक घराच्या पायाचे उत्खनन सुरू असताना हा शोध लागला. उत्खननादरम्यान संशोधकांना जमिनीखाली एक खड्डा आढळला, ज्यामध्ये मातीच्या भांड्याचे (ज्याला स्थानिक भाषेत ‘कँड्युष्का’ म्हणतात) अवशेष सापडले.

या भांड्यात एकूण 409 सोन्याची नाणी अत्यंत सुरक्षित अवस्थेत होती. यामध्ये 1848 ते 1911 दरम्यान पाडलेल्या नाण्यांचा समावेश आहे. 387 नाणी प्रत्येकी 10 रुबलची आहेत. 10 नाणी प्रत्येकी 5 रुबलची असून 10 नाणी प्रत्येकी 15 रुबलची आहेत. तसेच, 2 नाणी प्रत्येकी 7.5 रुबलची आहेत. यातील बहुतांश नाणी रशियाचे शेवटचे सम्राट झार निकोलस द्वितीय यांच्या काळातील आहेत. निकोलस आणि त्यांच्या रोमनोव्ह राजघराण्याला 1917 च्या रशियन क्रांतीनंतर 1918 मध्ये मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली होती.

तज्ज्ञांच्या मते, 1917 च्या क्रांतीच्या दरम्यान किंवा त्यानंतरच्या धामधुमीत हा खजिना लपवण्यात आला असावा. परिस्थिती निवळल्यानंतर मालकाला ही नाणी परत घ्यायची होती. परंतु, कदाचित काही कारणास्तव ते शक्य झाले नसावे. ऐतिहासिक नोंदींनुसार, 19 व्या शतकाच्या शेवटी आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीला या परिसरात सुमारे 24 कुटुंबे राहत होती. मात्र, जुने घरांचे क्रमांक आणि आधुनिक क्रमांक यांची सांगड घालत नसल्याने, नक्की कोणत्या कुटुंबाने ही बचत लपवून ठेवली होती, याचा शोध अद्याप लागलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news