तीन हजार वर्षांपूर्वीच्या मकबर्‍यातील सोन्या-चांदीचा खजिना

या मकबर्‍यात सापडलेल्या वस्तूंमध्ये शुद्ध सोन्याचा मुखवटाही होता
Treasure of gold and silver from a three-thousand-year-old tomb
तीन हजार वर्षांपूर्वीच्या मकबर्‍यातील सोन्या-चांदीचा खजिनाPudhari File Photo
Published on
Updated on

कैरो : इजिप्तचा प्राचीन फेरो म्हणजेच राजा तुतानखामेन याच्या मकबर्‍यामध्ये सापडलेला खजिना हा आजही जगातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा पुरातत्त्व शोध मानला जातो. इ.स.पू. 1323 मध्ये वयाच्या केवळ 19व्या वर्षी कालवश झालेल्या या तरुण राजाचा मृत्यूही रहस्यमय समजला जातो. त्याच्या मृत्यूनंतर तब्बल 3200 वर्षांनी, 1922 साली ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ हॉवर्ड कार्टरने त्याचा मकबरा शोधून काढला आणि त्यासोबत उघड झाला एक भव्य आणि चकित करणारा खजिना.

तुतानखामेनच्या खजिन्यातील सोन्या-चांदीच्या वस्तूंनी तसेच त्याच्या मकबर्‍यातील सजावटीने संशोधक थक्कच झाले. त्याच्या मकबर्‍यात सापडलेल्या प्रमुख वस्तूंमध्ये शुद्ध सोन्याचा मुखवटाही होता. हा मुखवटा सुमारे 11 किलो वजनाचा, शुद्ध सोन्याने बनवलेला आणि नीलम, लाजवर्द यांसारख्या मौल्यवान रत्नांनी सजलेला आहे. हा मुखवटा आजही इजिप्तच्या राष्ट्रीय संग्रहालयातील सर्वात प्रसिद्ध वस्तूंपैकी एक आहे. या मकबर्‍यात सोने आणि अन्य मौल्यवान धातूंनी मढवलेल्या शवपेट्याही आढळल्या होत्या.

तुतानखामेनच्या ममीसाठी तीन वेगवेगळ्या स्तरांतील पेट्या वापरल्या गेल्या होत्या, त्यात एक पूर्णपणे सोन्याची होती. शिवाय मकबर्‍यात अंगठ्या, कंठहार, कानातले, पट्टे इत्यादी हजारो मौल्यवान वस्तूही सापडल्या. या दागिन्यांमध्ये सोनं, चांदी, माणिक, नीलम, लाजवर्द यांसारखे रत्न वापरले गेले आहेत. मकबर्‍यातील फर्निचर हस्तिदंती तसेच मौल्यवान लाकडाचे आहे. त्यामध्ये सिंहासन, पलंग, खुर्च्या, पेटारे (काही सोन्याच्या पत्र्याने मढवलेले) आहेत. यावर अतिशय बारकाईने कोरलेली नक्षी आणि रंगकाम पाहायला मिळते. मकबर्‍यात खंजीर, धनुष्यबाण, ढाल असे युद्धसाहित्यही आढळले.

युद्धासाठी वापरण्यात येणारा सोन्याच्या सजावटीचा रथ, खाद्यपदार्थ, मद्यपात्रे आणि धार्मिक साहित्यही या मकबर्‍यात आढळले. मृत्यूनंतरच्या जीवनासाठी ठेवलेले धान्य, मद्याचे भांडे, देवतांच्या मूर्ती आणि पूजाविधीच्या वस्तूही यामध्ये होत्या. तुतानखामेनच्या मकबर्‍यात सापडलेल्या या वस्तूंमुळे प्राचीन इजिप्तमधील लोकांची जीवनशैली, धार्मिक श्रद्धा आणि राजेशाही परंपरा यांवर प्रकाश पडतो. इतर फेरोंचे मकबरे कालौघात लुटले गेले, परंतु तुतानखामेनचा मकबरा हा एकमेव अबाधित शाही मकबरा आहे, हीच त्याच्या खजिन्याची वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. तुतानखामेनच्या खजिन्यातील वस्तू जगभरातील प्रदर्शनांमध्ये दाखवण्यात आल्या असून, लाखो लोकांनी या ऐतिहासिक ठेव्याला पाहिले आहे. सध्या त्यातील अनेक वस्तू कैरो येथील ‘ग्रँड इजिप्शियन म्युझियम’मध्ये ठेवण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news