

वॉशिंग्टन : एकेकाळी मोठ्या खोक्यासारख्या आकाराचे टीव्ही मिळत. तासन्तास लोकांना समोर बसायला लावणार्या अशा टीव्हीला त्यामुळेच ‘इडियट बॉक्स’ असे नाव पडले होते! काळाच्या ओघात टीव्ही अधिक सडपातळ आणि अद्ययावत झाले. आता तर अगदी घडी घालता येणारे किंवा गुंडाळून ठेवता येणारे टीव्हीही बनले आहेत.
इलेक्ट्रॉनिक उत्पादने बनवणार्या कंपन्यांमध्ये सध्या मोठी स्पर्धा आहे आणि प्रत्येक कंपनी असे उत्पादन बनवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, जे तुमचा अनुभव एका नवीन स्तरावर घेऊन जाईल. एलजी या कंपनीने असेच एक उत्पादन बनवले आहे. या कंपनीने असा पारदर्शक टीव्ही बनवला आहे, ज्याच्या किमतीची सर्वत्र चर्चा होत आहे. खरं तर, या टीव्हीची किंमत 51 लाख रुपये आहे. कंपनीने सध्या तो फक्त अमेरिकेत लाँच केला आहे. कंपनीने या टीव्हीला ‘एलजी सिग्नेचर ओएलईडी टी’ असे नाव दिले आहे. ‘एलजी’ने कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो 2024 मध्ये या टीव्हीची पहिली झलक दाखवली होती आणि आता तो लाँच केला आहे. कंपनीने त्याला व्यवस्थित करण्यासाठी वायरलेस व्हिडीओ आणि ऑडिओ ट्रान्समिशन तंत्रज्ञानाशी जोडले आहे.
या टीव्हीमध्ये अगदी नवीन अल्फा 11 एआय प्रोसेसर आहे, जो मागील प्रोसेसरपेक्षा 4 पट चांगली एआय कार्यक्षमता, 70 टक्के चांगली ग्राफिक कार्यक्षमता आणि 30 टक्के वेगवान प्रक्रिया गती देतो. ‘एलजी सिग्नेचर ओएलईडी टी’ या टीव्हीची किंमत 60,000 डॉलर्स म्हणजेच सुमारे 51,10,800 रुपये आहे. कंपनीने हा टीव्ही भारतात कधी लाँच करणार याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. या टीव्हीमध्ये 77-इंच 4 के ओएलईडी पॅनेल आहे. विशेष म्हणजे, वापरकर्ते पारदर्शक आणि अपारदर्शक मोडमध्ये निवड करू शकतात.