

वॉशिंग्टन : वाढती थंडी आणि घरांना उबदार ठेवण्यासाठी होणारा विजेचा प्रचंड खर्च यावर अमेरिकेतील कोलोरॅडो बोल्डर युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी एक अनोखा उपाय शोधला आहे. त्यांनी ‘मोची’ नावाचा एक नवीन पारदर्शक पदार्थ तयार केला आहे, जो खिडक्यांमधून होणारी उष्णतेची गळती रोखून घराचे तापमान राखण्यास मदत करेल.
जगभरात वापरल्या जाणार्या एकूण ऊर्जेपैकी सुमारे 40 टक्के ऊर्जा इमारतींना गरम ठेवण्यासाठी खर्च होते. मात्र, खिडक्यांच्या काचांमधून घरातील उष्णता सहज बाहेर पडते आणि बाहेरची थंडी आत येते, ज्यामुळे घर गरम ठेवण्यासाठी सतत हीटर वापरावे लागतात. ‘मोची’ हेच रोखण्याचे काम करते. ‘मोची’ ही एक सिलिकॉनवर आधारित शीट आहे. शास्त्रज्ञांनी याचे वर्णन एका विशेष प्रकारच्या ‘बबल रॅप’सारखे केले आहे. या शीटमध्ये मानवी केसांपेक्षाही अनेक पटींनी पातळ अशी नळीसारखी छिद्रे असतात.
या छिद्रांमधून हवेचे कण एकमेकांवर आदळण्याऐवजी छिद्रांच्या भिंतींवर आदळतात. यामुळे उष्णतेचे वहन थांबते. केवळ 5 मिलीमीटर जाडीची ही शीट इतकी प्रभावी आहे की, जर तुम्ही ही शीट आगीसमोर धरली आणि मागे हात ठेवला, तरी हाताला चटका बसत नाही. ही शीट बनवण्यासाठी ‘सर्फेक्टंट’ अणूंचा वापर सिलिकॉनच्या द्रावणात केला जातो. हे अणू आपोआप धाग्यांसारखी रचना तयार करतात आणि सिलिकॉन त्याभोवती चिकटते. नंतर सर्फेक्टंट काढून त्या जागी हवा भरली जाते, ज्यामुळे अतिसूक्ष्म नळ्या तयार होतात.
बाजारात सध्या मिळणार्या इन्सुलेशन फिल्म्स लावल्यामुळे खोलीत अंधार होतो किंवा बाहेरचे द़ृश्य नीट दिसत नाही. मात्र, ‘मोची’ पूर्णपणे पारदर्शक असल्याने खिडकीचा नजारा बिघडत नाही आणि सूर्यप्रकाशही पुरेसा येतो. संशोधक इवान स्माल्युख यांच्या मते, या तंत्रज्ञानामुळे बाहेरील हवामान कसेही असले, तरी घरातील तापमान आरामदायक ठेवण्यासाठी जास्तीची वीज खर्च करावी लागणार नाही. सध्या हे तंत्रज्ञान प्रयोगशाळेत विकसित केले जात असून, यासाठी लागणारा कच्चा माल स्वस्त आहे. लवकरच याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे.