हेलसिंकी : जगभरात सुरू असलेला कोरोना व्हायरसचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी तमाम देश प्रयत्न करीत आहेत. मात्र, म्हणावे तितके यश मिळत नाही, असे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजना अंमलात आणण्यात येत आहेत. यामध्ये आता एका नव्या आणि अनोख्या उपायाची भर पडली आहे. फिनलँडमध्ये कोरोनाचा शोध घेण्यासाठी विमानतळावर चक्क प्रशिक्षित श्वानालाच (स्निफर डॉग) तैनात करण्यात आले आहे.
हेलसिंकी विमानतळावर तैनात असलेले हे 'स्निफर श्वान' उच्च प्रशिक्षित असून, ते अवघ्या 10 मिनिटांत कोरोना व्हायरसचा शोध घेऊ शकते. उल्लेखनीय म्हणजे 'मिना' असे नाव असलेल्या या स्निफर श्वानाला रशियात खास प्रशिक्षण देण्यात आले आहे.
फिनलँड या लहानशा देशातही कोरोनाने उच्छाद मांडला असून, तेथे सध्या 10 हजारांहून अधिक लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. सुमारे 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून फिनलँडमध्ये आवश्यक ते सर्व उपाय अंमलात आणण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून विमानतळावर एखादा कोरोनाबाधित रुग्ण असेल तर त्याचे झटपट निदान व्हावे म्हणून मिना या स्निफर श्वानाला खास प्रशिक्षण देऊन तैनात करण्यात आले आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्यास मदत मिळणार नाही, असा विश्वास विमानतळ अधिकार्यांना वाटतो.