Domoic Acid | विषारी ‘डोमोईक ॲसिड’मुळे समुद्री सिंह होत आहेत हिंसक

कॅलिफोर्निया किनार्‍यावर घबराटीचे वातावरण; मानवासाठीही धोक्‍याची घंटा
Domoic Acid |
Domoic Acid | विषारी ‘डोमोईक ॲसिड’मुळे समुद्री सिंह होत आहेत हिंसक
Published on
Updated on

सॅन फ्रान्सिस्को : अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर (कॅलिफोर्निया) विचित्र आणि हिंसक वर्तन करणारे शेकडो समुद्री सिंह (सी लायन्‍स) आढळल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. हे प्राणी एका धोकादायक न्यूरोटॉक्सिनमुळे (चेतातंतूंवर परिणाम करणारे विष) ‘डोमोईक ॲसिड पॉईझनिंग’ या आजाराने ग्रस्त असून यामुळे त्यांच्या मेंदूवर गंभीर परिणाम झाला आहे. ‘द मरीन मॅमल सेंटर’च्या तज्ज्ञांनुसार, समुद्रातील अल्गी‍, शेवाळामुळे हे विष पसरत आहे. हे विषयुक्त शेवाळ खाणाऱ्या सरडाईन आणि अँकोव्हीजसारख्या लहान माशांना समुद्री सिंह खातात, त्‍यामुळे त्यांच्या मेंदूत बिघाड होऊन त्यांना झटके येणे, अस्वस्थ होणे आणि माणसांवर हल्ला करण्याची प्रवृत्ती वाढणे, असे प्रकार घडत आहेत.

एका संशोधनानुसार, २०२६ मध्ये आतापर्यंत १०० हून अधिक बाधित समुद्री सिंह किनाऱ्यावर आले आहेत. सरासरी वर्षातील ७० ते ९० समुद्री सिंहांच्‍या रुग्णसंख्‍येच्या तुलनेत हा आकडा मोठा आहे. समुद्री सिंहाच्या चावण्याने हे विष माणसात पसरत नाही; परंतु विषारी मासे, शिंपले, खेकडे किंवा सुके मासे खाल्ल्यास मानवाला ‘ॲम्नेसिक शेलफिश पॉईझनिंग’ (एएसपी) होऊ शकते, जे मानवासाठी प्राणघातक ठरू शकते. शिजवल्याने किंवा फ्रीझ केल्याने हे विष नष्ट होत नाही.

‘सुपर अल निनो’चा प्रभाव

शास्त्रज्ञांच्या मते, पॅसिफिक महासागराचे तापमान विक्रमी पातळीवर वाढवणाऱ्या ‘अल निनो’ प्रभावामुळे हे शेवाळ झपाट्याने पसरत आहे. गरम पाण्यामुळे ‘स्यूडो-निट्झचिया’ (Pseudo-nitzschia) नावाचे शेवाळ प्रचंड प्रमाणात वाढले आहे. प्रशासनाचा इशारा : वन्यजीव अधिकाऱ्यांनी नागरिकांना समुद्रकिनाऱ्यावर आढळणाऱ्या कोणत्याही आजारी किंवा असंतुलित समुद्री सिंहापासून किमान १५० फूट दूर राहण्याचा कडक इशारा दिला आहे. या विषामुळे समुद्री सिंह अत्यंत भांबावलेले आणि हिंसक होऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news