

वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ने १९८४ मध्ये तब्बल १.२५ कोटी टोमॅटोची बियाणे अंतराळात पाठवली होती. तब्बल सहा वर्षांनंतर म्हणजेच १९९० मध्ये ही बियाणे पृथ्वीवर परत आणण्यात आली आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ‘प्लांट किट’ म्हणून वाटण्यात आली. जगभरातील ४० देशांमधील सुमारे ४०,००० शाळांमध्ये ही बियाणे लावण्यात आली होती. अंतराळातील वातावरणात राहिल्यामुळे बियाण्यांच्या रुजण्यावर आणि रोपांच्या वाढीवर काही परिणाम होतो का, हे शोधणे हा या प्रयोगाचा मुख्य उद्देश होता. या संशोधनातून अत्यंत मनोरंजक आणि महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आले आहेत.
‘नासा’च्या या ऐतिहासिक प्रकल्पाचे नाव ‘सीड्स’ (SEEDS - Space Exposed Experiment Developed for Students) असे होते. या उपक्रमात ‘नासा’ मुख्यालय, लँगली रिसर्च सेंटर आणि अमेरिकेतील पारंपरिक बियाणे पुरवठादार कंपनी ‘जॉर्ज डब्ल्यू. पार्क सीड’ एकत्र आले होते. बियाण्यांचा एक गट अंतराळात पाठवणे आणि दुसरा गट पृथ्वीवर सुरक्षित ठेवणे, ही या प्रयोगामागची मूळ कल्पना होती. त्यानंतर दोन्ही गटांतील एकसारखी बियाणे शाळांमध्ये वाटण्यात आली, जेणेकरून विद्यार्थ्यांनी दोन्ही बियाणे शेजारी-शेजारी लावून त्यांच्या वाढीची तुलना करावी. सर्व १.२५ कोटी बियाणे ‘रटगर्स कॅलिफोर्निया सुप्रीम’ या जातीची होती, जी अमेरिकेत सामान्यतः पिकवली जाणारी टोमॅटोची एक जात आहे.
अनुवांशिक फरकांमुळे (Genetic differences) निकालात कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून एकाच जातीच्या बियाण्यांची निवड करण्यात आली होती. ही बियाणे अंतराळात नेण्यासाठी ‘लॉन्ग ड्युरेशन एक्स्पोजर फॅसिलिटी’ (LDEF) या ९.७ टन वजनाच्या १२ बाजू असलेल्या दंडाकृती उपकरणाचा वापर करण्यात आला होता. बियाणे पृथ्वीवर परत आल्यानंतर प्रकल्पाचा शैक्षणिक टप्पा सुरू झाला. ‘नासा’च्या अहवालानुसार, ४०,००० शाळांमधील शिक्षकांना सुमारे १,३२,००० प्लांटिंग किट्स वाटण्यात आल्या, ज्यांच्या माध्यमातून ३३ लाख विद्यार्थ्यांपर्यंत हा प्रयोग पोहोचला. यामध्ये अमेरिकेतील सर्व ५० राज्ये आणि जगभरातील इतर ३० हून अधिक देशांचा समावेश होता. प्रत्येक किटमध्ये बियाण्यांचे दोन्ही गट होते.
सहा वर्षे अंतराळात घालवलेली बियाणे आणि तेवढाच काळ नियंत्रित वातावरणात पृथ्वीवर ठेवलेली बियाणे (ज्याला विज्ञानाच्या भाषेत ‘कंट्रोल’ म्हणतात). यामुळे दिसून येणारा फरक हा खरोखरच अंतराळातील प्रवासामुळे झाला आहे की बियाण्यांच्या प्रकारामुळे, हे स्पष्ट होण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांनी दोन्ही बियाण्यांपैकी किती बियाणे रुजली, पहिला अंकुर येण्यासाठी किती वेळ लागला आणि आठवडाभरात रोपांची वाढ कशी झाली, याची सविस्तर नोंद ठेवली. तसेच फुले येणे, फळे धरणे आणि पाना-फांद्यांची स्थिती यावरही लक्ष ठेवले. हा सर्व डेटा ‘नासा’कडे पाठवण्यात आला. ‘नासा’ला देशभरातील वर्गांमधून सुमारे ८,००० अहवाल प्राप्त झाले.
प्रयोगाचे निष्कर्ष
रुजण्याचा दर (Germination Rate): अंतराळात ठेवलेल्या बियाण्यांचा रुजण्याचा दर ७३.८ टक्के होता, तर पृथ्वीवरील बियाण्यांचा दर ७०.३ टक्के होता. अंकुर येण्याचा काळ : अंतराळातील बियाण्यांना अंकुर फुटण्यासाठी सरासरी ८ दिवस लागले, तर पृथ्वीवरील बियाण्यांना ८.३ दिवस लागले. वाढ आणि फळे : पहिल्या तीन आठवड्यांत अंतराळातील बियाण्यांची सुरुवातीची वाढ थोडी जलद दिसून आली. मात्र, रोपे पूर्ण वाढल्यानंतर किंवा फळांच्या गुणवत्तेत कोणताही मोठा फरक आढळला नाही.