Exercise Tips | व्यायामाचा कंटाळा आलाय? ‘हा’ सोपा उपाय करा!

तुमचा मेंदू आणि शरीर दोन्ही ‘सुपरचार्ज’ करेल
Slug: Tired of Exercise? Try This Simple Solution!
व्यायामाचा कंटाळा आलाय? ‘हा’ सोपा उपाय करा!Pudhari File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : अनेकदा व्यायामाची इच्छा असूनही मानसिक थकव्यामुळे आपल्याला सुरुवात करणेही कठीण वाटते. दिवसभराच्या कामानंतर किंवा तणावामुळे शरीर आणि मन दोन्ही थकून जाते, ज्यामुळे व्यायामाचा कंटाळा येतो. पण, एका सोप्या आणि प्रभावी उपायाने तुम्ही हा कंटाळा सहज दूर करू शकता.

एडिनबर्ग विद्यापीठाच्या एका नवीन संशोधनानुसार, धावताना किंवा व्यायाम करताना तुमची आवडती गाणी ऐकल्याने मानसिक थकवा कमी होतो आणि तुमची कामगिरी सुधारते. संगीतामध्ये उपचारात्मक शक्ती असते, हे सर्वांनाच माहीत आहे; पण या अभ्यासातून असे दिसून आले की, मानसिक थकवा जाणवत असतानाही संगीत ऐकल्यास व्यक्तीची व्यायामाची क्षमता वाढते. या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी दोन प्रकारच्या चाचण्या घेतल्या. 18 फिटनेसप्रेमी लोकांच्या गटावर हा अभ्यास करण्यात आला.

एका चाचणीत, सहभागींना मानसिकद़ृष्ट्या थकवणार्‍या एका कॉम्प्युटर टेस्टनंतर धावण्यास सांगितले गेले. यावेळी काही जणांना त्यांनी स्वतः निवडलेली प्रेरणादायी गाणी ऐकण्यास दिली, तर काहींना संगीताशिवाय धावण्यास सांगितले. त्यानंतर काढण्यात आलेल्या निष्कर्षात असे आढळून आले की, मानसिक थकवा असताना संगीत ऐकत धावणार्‍यांची क्षमता ही संगीत न ऐकता धावणार्‍यांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त होती. विशेष म्हणजे, थकलेल्या अवस्थेत संगीत ऐकताना त्यांची कामगिरी, ते ताजेतवाने असताना केलेल्या कामगिरीइतकीच चांगली होती. 5 किलोमीटर धावण्याच्या चाचणीतही संगीत ऐकणार्‍यांच्या वेळेत सुधारणा दिसून आली. संशोधकांच्या मते, संगीत ऐकताना श्रमाची किंवा कष्टाची जाणीव कमी होते, ज्यामुळे व्यक्तीला अधिक व्यायाम करण्याची प्रेरणा मिळते.

या अभ्यासाचे नेतृत्व करणारे डॉ. शॉन फिलिप्स म्हणाले, मानसिक थकवा ही एक सामान्य समस्या आहे, जी आपल्या दैनंदिन कामांवर आणि व्यायामावर नकारात्मक परिणाम करते. आमचे निष्कर्ष सांगतात की, स्वतः निवडलेले प्रेरणादायी संगीत ऐकणे ही एक उपयुक्त आणि प्रभावी रणनीती ठरू शकते. यामुळे लोकांना त्यांच्या व्यायामाचा दर्जा टिकवून ठेवण्यास मदत मिळेल. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला व्यायामाचा कंटाळा येईल, तेव्हा तुमचे आवडते हेडफोन लावा आणि आपल्या आवडीच्या गाण्यांवर ठेका धरत व्यायामाला सुरुवात करा. हा छोटासा बदल तुम्हाला नक्कीच नवी ऊर्जा देईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news