

उन्हाळ्यात वाढलेल्या उष्णतेपासून आणि उकाड्यापासून आराम मिळवण्यासाठी एअर कंडिशनर (AC) ही एक अत्यावश्यक वस्तू बनली आहे. मात्र ‘एसी’ चा आनंद घेताना वीजबिलाचा ताणदेखील जाणवू लागतो. विशेषतः, जेव्हा दिवसभर ‘एसी’ सुरू असतो, तेव्हा महिन्याअखेरीस मोठं बिल येऊन खिशाला चटका बसतो. पण, काही साधे आणि प्रभावी उपाय अवलंबून तुम्ही ‘एसी’ चा योग्य वापर करत विजेची बचत करू शकता. चला पाहूया, हे 5 सोपे उपाय :
खूप लोकांना वाटतं की, ‘एसी’ 18°C किंवा 20°C वर चालवल्यास रूम लवकर थंड होईल आणि वीज वाचेल; पण ही कल्पना चुकीची आहे. Bureau of Energy Efficiency ( BEE) च्या मते, ‘एसी’ 24 डिग्री सेल्सिअसवर चालवणं सर्वात ऊर्जा-कार्यक्षम आणि आरोग्यासाठी उपयुक्त आहे. रिसर्चनुसार, तुम्ही प्रत्येक 1°C ने तापमान कमी केल्यास सुमारे 10% अधिक वीज लागते. त्यामुळे 24°C वर ‘एसी’ चालवून तुमचं वीजबिल नक्कीच कमी होईल.
रात्रभर ‘एसी’ सुरू ठेवणं केवळ विजेचा अपव्ययच करत नाही, तर शरीरावरही विपरीत परिणाम करू शकतो. त्यामुळे टाईमर सेट करा किंवा स्लीप मोड वापरा. स्लीप मोडमध्ये ‘एसी’ हळूहळू तापमान वाढवत राहतं, ज्यामुळे थंडपणाही टिकून राहतो आणि मोटर कमी मेहनत करते, यामुळे वीजबचत होते.
‘एसी’ चं कार्यक्षमतेने चालू राहणं, हे त्याच्या देखभालीवर अवलंबून असतं. जर फिल्टर किंवा वेंट गडद झाले असतील, तर ‘एसी’ ला रूम थंड करण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे दर 3 ते 6 महिन्यांनी ‘एसी’ ची सर्व्हिसिंग नक्की करून घ्या. वेळ नसल्यास स्वतःही फिल्टर स्वच्छ करू शकता. ही छोटीशी कृती मोठ्या वीजबचतीस कारणीभूत ठरते.
आजकाल बाजारात इन्व्हर्टर आणि नॉन-इन्व्हर्टर अशा दोन प्रकारचे ‘एसी’ उपलब्ध आहेत. नॉन-इन्व्हर्टर ‘एसी’ वारंवार ऑन-ऑफ होतं, ज्यामुळे वीजखपत वाढते. तर इन्व्हर्टर ‘एसी’ खोलीतील तापमानानुसार स्वतःच अॅडजस्ट होतं आणि वीजबचत करतं. जर तुम्ही नवीन ‘एसी’ घेण्याचा विचार करत असाल, तर इन्व्हर्टर ‘एसी’ ही एक चांगली, दीर्घकालीन आणि बचतीची गुंतवणूक आहे.
‘एसी’ ची थंड हवा टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे की, बाहेरची उष्णता खोलीत येऊ नये. यासाठी खिडक्यांवर जाड पडदे लावा, दरवाजे नीट बंद ठेवा. शक्य असल्यास छत आणि भिंतींवर इंसुलेशनचा वापर करा. यामुळे ‘एसी’ वर ताण कमी पडतो आणि थंडी जास्त वेळ टिकते.